Shaheen Afridi : पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BAN) यांच्यादरम्यान रावळपिंडी येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस संपला. पाकिस्तानने पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या डावात 565 धावांची मोठी मजल मारली. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वात मोठी खेळी खेळली. रहीम आपल्या द्विशतकापासून फक्त 9 धावा दूर राहिला. तर, शादमान इस्लामने 93 आणि मेहदी हसन मिराजने 77 धावा केल्या.
पाकिस्तानकडून नसीम शाहने सर्वाधिक 3 बळी घेतले. खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अलीने 2-2 विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीही 2 विकेट घेण्यात यशस्वी ठरला. शाहीनने मेहदी हसन मिराझच्या रूपाने मोठी विकेट घेतली आणि त्यानंतर हसन महमूदला शून्यावर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हसनला बाद केल्यानंतर शाहीनचा जल्लोष पाहण्यासारखा होता.
शाहीनने हसनला रिझवानच्या हाती झेलबाद केले. यानंतर त्याने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. विकेट घेतल्यानंतर त्याने बाळाला हाताने खाऊ घालण्याचा इशारा केला. या सेलिब्रेशनमुळे शाहीन पिता झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली. शाहीन पिता होणार असल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. शाहीन हा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई आहे. शाहीनचे गेल्या वर्षी आफ्रिदीची मुलगी अंशासोबत लग्न झाले होते.
बांगलादेशच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुरम शहजाद आणि मोहम्मद अली यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. बांगलादेशचा निम्मा संघ 218 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर मुशफिकुर रहीमने लिटन दास व मेहदी हसन यांच्यासोबत भागीदाऱ्या करत संघाला सामन्यात कायम ठेवले. रहीम याला आपल्या कारकिर्दीतील तिसरे द्विशतक पूर्ण करता आले नाही. तो 191 धावांवर बाद झाला. मात्र, त्यांनी संघाला निर्णयाक आघाडी मिळवून दिली. चौथ्या दिवशीच्या समाप्तीनंतर, पाकिस्तानने एक बाद 23 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
“रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जाणार”, निवृत्तीनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया
“मी शाळेतही कधी सस्पेंड झालो नव्हतो”, ‘कॉफी विथ करण’मधील वादावर राहुलचं मोठं वक्तव्य
निवृत्त झाल्यानंतरही धवनचा दबदबा कायम! सेना देशात अशी कामगिरी करणारा एकमेव सलामीवीर