टी-20 विश्वचषक 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये अफगाणिस्तानची कामगिरी अत्यंत साधारण राहिली. राशिद खानच्या (Rashid Khan) नेतृत्वाखालील या संघाकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु संघ ‘सुपर 8’ फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने अफगाणिस्तानचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे. आता या खराब कामगिरीनंतर कर्णधार राशिद (Rashid Khan) खानला मोठे पद गमवावे लागण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (ACB) राशिद खानला कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार करत आहे. या पदावर चर्चेसाठी बोर्डाने इब्राहिम जादरानला काबुलला बोलावले आहे. इब्राहिम जादरान अफगाणिस्तानचा नवा कर्णधार होण्याची दाट शक्यता आहे. राशिदला हटवण्यामागे केवळ मैदानातील कामगिरीच नाही, तर काही ‘वैयक्तिक’ आणि ‘क्रिकेटबाहेरील’ मुद्दे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
राशिद खान या विश्वचषकात आपल्या फिरकीने प्रभाव पाडू शकला नाही. त्याने 4 सामन्यांत केवळ 6 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 5 विकेट्सनी हरवले. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘डबल सुपर ओव्हर’मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी यूएई आणि कॅनडाला हरवले, पण ‘सुपर 8’ मध्ये जाण्यासाठी ते पुरेसे नव्हते.





