बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषक 2024 मधून बाहेर पडला आहे. पाकिस्तान भारत आणि अमेरिकेसह विश्वचषकाच्या ‘अ’ गटात होता. हे दोन्ही संघ सुपर 8 साठी पात्र ठरले आहेत.
पाकिस्तानच्या संघानं विश्वचषकात खराब कामगिरी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही या संघानं विश्वचषकात चाहत्यांना निराश केलं आहे. संघाचा कर्णधार बाबर आझमबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं अनेकदा मोक्याच्या क्षणी कच खाल्ली आहे. टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्रचंड नाट्य घडलं होतं. याचे परिणाम संघाला भोगावे लागले.
पाकिस्तानचा संघ 2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातून ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. यानंतर बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आणि शाहीन आफ्रिदीकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं. या दरम्यान निवडकर्ते आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही बदलण्यात आले. मात्र या टी20 विश्वचषकापूर्वी शाहीनला कर्णधारपदावरून हटवून पुन्हा बाबरकडे जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र त्याच्या नेतृत्वात संघ सुपर 8 मध्येही पोहोचू शकला नाही.
बाबर आझम मोठ्या प्रसंगी फ्लॉप ठरला आहे. टी20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत संघाचा पराभव झाला. टी20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
2022 नंतर पाकिस्तान क्रिकेट संघाची परिस्थिती बिकट झाली आहे. पाक संघ 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरू शकला नाही. यानंतर ते आशिया कप 2023 साठी देखील पात्र ठरू शकले नाही. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानचा संघ सपशेल अपयशी ठरला. यानंतर आता ते 2024 च्या टी20 विश्वचषकातूनही बाहेर पडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मासोबत मतभेद?…म्हणून शुबमन गिलला टीम मॅनेजमेंटनं परत पाठवलं, मिळाली मोठ्या चुकीची शिक्षा
नेपाळचा हार्टब्रेक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या एका धावेनं पराभव
टी20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला दुहेरी झटका, 2026 च्या स्पर्धेत थेट एंट्री मिळणार नाही!