पाकिस्तान क्रिकेट संघ पुन्हा एकदा संकटात सापडला आहे, कारण त्यांची नेतृत्व आणि प्रशिक्षक बदलाची कधीही न संपणारी संगीत खुर्ची सुरूच आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी फक्त चार महिने बाकी असताना, संघाला पुन्हा एकदा नवीन कर्णधार आणि नवीन प्रशिक्षक मिळाला आहे. गॅरी कर्स्टन व बाबर आझम यांनी राजीनामा दिल्यानंतर, मोहम्मद रिझवानला नवीन वनडे आणि टी20 कर्णधार तर जेसन गिलेस्पीला स्टँड-इन प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
नवा कर्णधार आणि नवा प्रशिक्षक हे पाकिस्तान क्रिकेटमधील हलकल्लोळ थांबवण्यासाठी प्रयत्न करतील. पीसीबी, खेळाडू, प्रशिक्षक, निवड समिती आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यातील राजकारण दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
पाकिस्तान 4 नोव्हेंबर रोजी पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध लढण्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तानने शेवटच्या वेळी 11 नोव्हेंबर 2023 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे वनडे विश्वचषकात वनडे सामना खेळला होता. जिथे त्यांना पराभव पत्करावा लागलेला. जवळपास 12 महिन्यांपासून, संघाने 50 षटकांचा एकही सामना खेळलेला नाही. नोव्हेंबरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्यंत संघ 11 एकदिवसीय सामने खेळेल.
वनडे विश्वचषकातून संघ बाहेर पडल्यानंतर बाबर आझम वनडे कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्यानंतर पाकिस्तानने शाहीन शाह आफ्रिदीला नवीन टी20 कर्णधार म्हणून नियुक्त करून प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. तथापि, केवळ एका मालिकेनंतर संघाचे नेतृत्व केल्यानंतर पुन्हा आफ्रिदीची जागा बाबर आझमने घेतली.
आझमने टी20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व करण्यासाठी पुनरागमन केले. मात्र, विश्वचषकात पहिल्या फेरीतून बाद झाल्यानंतर दोन महिन्यांनी राजीनामा दिला. त्यावेळी त्याने अतिरिक्त ताण हे कारण देत आपले पद सोडले होते. आता, पीसीबीने मोहम्मद रिझवानला पूर्णवेळ वनडे व टी20 कर्णधार आणि सलमान अली आगाला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2025 लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? ‘हा’ संघ पहिल्या क्रमांकावर
‘या’ स्टार खेळाडूला संघातून वगळल्यानंतर निवडकर्त्यांवर भडकले गावसकर, म्हणाले…
BGT; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी निवडकर्त्याला झाली कोहली-पुजाराच्या जोडीची आठवण! म्हणाला…