आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघ खेळणार नसल्याचं पाकिस्तान सरकारने जाहीर केल्यानंतर क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारीला नियोजित भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या बहिष्कारामागचं ठोस कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही. या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना बहुप्रतिक्षित हायव्होल्टेज सामन्याला मुकावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास केवळ चाहत्यांचंच नव्हे, तर आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही (PCB) मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. या निर्णयावरून पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वातून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, भविष्यातील आयसीसीसोबतचे संबंध आणि आर्थिक तोटा लक्षात घेता पाकिस्तान हा निर्णय मागे घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अशातच आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना खेळण्यासाठी एक अट ठेवली आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत बांगलादेशचा समावेश केला तरच पाकिस्तान भारताविरुद्ध खेळेल, असं पाकिस्तानकडून सूचित करण्यात आलं आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
भारत-पाकिस्तान सामना हा कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. दुसरीकडे, बांगलादेशने सुरक्षेचं कारण पुढे करत या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या आदेशानंतर आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला संघातून मुक्त केलं. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आयसीसीकडे सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली होती. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळली आणि भारतातच सामने खेळावे लागतील, असं स्पष्ट केलं. परिणामी बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला.
दरम्यान, पाकिस्तान आधीच आर्थिक अडचणीत आहे. आयसीसी स्पर्धांमधून सहभागी संघांना मोठा आर्थिक फायदा होतो. विशेषतः भारत-पाकिस्तान सामन्यातून होणारी कमाई ही हजारो कोटींच्या घरात असते. त्यामुळे पाकिस्तान हा निर्णय कायम ठेवणार की आर्थिक हितसंबंध आणि आयसीसीसोबतचे भविष्यातील संबंध लक्षात घेऊन माघार घेणार, याकडे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.






