पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान कराची येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान पाकिस्तानने वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी अखेरच्या सत्रात बसलेल्या धक्क्यातून सावरत, पाकिस्तानच्या मध्यफळीने नेटाने फलंदाजी करत पाकिस्तानला पहिल्या डावात ८८ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली आहे. फवाद आलमने झळकावलेले शतक दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
फवाद आलमने ठोकले दमदार शतक
पाकिस्तानने ४ बाद ३३ या धावसंख्येपासून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. अझर अली आणि फवाद आलम यांनी पाचव्या गड्यासाठी ९४ धावांची भर घातली. अझर अली ५१ धावांवर बाद झाला. यानंतर मोहम्मद रिझवानने काही काळ फवाद आलमला साथ देत ३३ धावा केल्या. आलम आणि फहीम अक्षफ यांनी सातव्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत पाकिस्तानला मजबूत स्थितीत आणले. या दरम्यान आलमने आपले तिसरे कसोटी शतक ठोकले. शतक पूर्ण केल्यानंतर मात्र तो लगेच तंबूत परतला. आलमने १०९ धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केले पुनरागमन
आलम बाद झाल्यावर फहीम अश्रफदेखील फार काळ टिकला नाही आणि ६४ धावा काढून बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात पाकिस्तानची धावसंख्या ८ बाद ३०८ अशी होती. पाकिस्तानकडून हसन अली ११ व नुआमन अली ६ धावा काढून नाबाद आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, एन्रिक नॉर्किए व केशव महाराज यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.
तिसरा दिवस ठरणार निर्णायक
आपल्या पहिल्या डावात २२० नावांवर सर्वबाद झालेला दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानचे उर्वरित दोन बळी मिळवून लवकरात लवकर फलंदाजीला येण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर मोठी धावसंख्या उभारून पाकिस्तानला विशाल लक्ष देण्याचा प्रयत्न दक्षिण आफ्रिका संघाचा असेल. सामन्याच्या दृष्टीने उद्याचा तिसरा दिवस महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील या स्थानी कायम
वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडूंचे कोरोना अहवाल आले पॉझिटिव्ह, मुकणार या स्पर्धेला
IND vs ENG : रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे चेन्नईत दाखल, इतके दिवसांसाठी असतील क्वारंटाईन