न्यूझीलंड दौर्यावरील पाकिस्तान क्रिकेट संघातील सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची पुष्टी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी (२६ नोव्हेंबर) केली. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. या सहा जणांना ख्राइस्टचर्चमध्ये ओयसोलेशनमध्ये ठेवले आहे. खरंतर पाकिस्तानी खेळाडूंनी ३-४ वेळा कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे आता थेट न्यूझीलंड सरकारनेच पाकिस्तानी संघांला चेतावणी दिली आहे की आता एकही चूक झाली तर त्यांना देशाबाहेर काढले जाईल.
त्याचबरोबर पाकिस्तान संघाला आयसोलेशनदरम्यान सरावासाठी मिळालेल्या सूटवरही आता बंदी घातली आहे.
याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी माहिती दिली. वसीम खान यांनी क्रिकइन्फोला सांगितले की ‘मी न्यूझीलंड सरकारशी चर्चा केली. न्यूझीलंड सरकारने सांगितले आहे की पाकिस्तान संघाने ३-४ वेळा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे उल्लंघन केले आहे. न्यूझीलंड हे सहन करणार नाही. त्यांनी आम्हाला अंतिम चेतावणी दिली आहे. मला माहित आहे की आमच्यासाठी हा कठिण काळ आहे. आम्हाला इंग्लंडमध्येही अशा स्थितीचा सामना करावा लागला होता.’
…तर देशाबाहेर काढले जाईल
तसेच वसीम खान म्हणाले, ‘आमच्यासाठी हे सोपे असणार नाही. आमच्यासाठी हा देशाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. मी माझ्या खेळाडूंना सूचना दिली. मी त्यांना १४ दिवस स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे. यानंतर आपण कुठेही फिरु शकता. न्यूझीलंडने आम्हाला स्पष्ट सांगितले आहे की एक जरी चूक झाल्यास आमच्या संघाला घरी पाठवले जाईल. हे खूप अपमानास्पद असेल.’
पाकिस्तानचा संघ मंगळवारी (२४ नोव्हेंबर) न्यूझीलंडला पोहचला आहे. पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्ध १८ डिसेंबरपासून ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. पाकिस्तान संघाने या दौऱ्यापूर्वी बाबर आझमला कसोटीचा कर्णधार म्हणून निवडले होते. ही त्याची कर्णधार म्हणून पहिलीच मालिका असणार आहे. याव्यतिरिक्त आझम आधीपासूनच वनडे आणि टी२० क्रिकेट संघाचे नेतृत्त्व करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अटीतटीच्या झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर विजय
ऑस्ट्रेलियन खेळाडूने बांधली हार्दिकच्या बुटाची लेस, व्हिडिओ व्हायरल
विराटची साडेसाती संपेना! सिडनीच्या मैदानावर पुन्हा अपयशी