कोविड-१९ मुळे बंद असलेले क्रिकेटजगत आता काहीसे पूर्वपदावर आले आहे. आधी काही आंतरराष्ट्रीय मालिका झाल्यानंतर कॅरिबियन प्रीमियर लीग व इंडियन प्रीमियर लीग या दोन मोठ्या स्पर्धा देखील पार पडल्या. २७ नोव्हेंबरपासून तीन आंतरराष्ट्रीय मालिकांना सुरुवात होतेय. अशातच, आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या पाकिस्तान संघाला एक जबर धक्का बसला आहे. पाकिस्तानचा अनुभवी सलामीवीर फखर झमान याला कोविड-१९ ची लक्षणे दिसल्याने, न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.
सर्व खेळाडूंची कोविड-१९ चाचणी आली होती निगेटिव्ह
पाकिस्तान संघ १८ डिसेंबरपासून न्यूझीलंडमध्ये टी२० मालिका खेळेल. नवीन क्वारंटाइन नियमांमुळे पाहुण्या संघांना काही दिवस अगोदरच यजमान देशात जाऊन राहावे लागत आहे. पाकिस्तान संघ आज (२३ नोव्हेंबर) न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी सर्व खेळाडूंची कोविड-१९ चाचणी घेण्यात आली होती. ज्यात सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले.
फखर झमानमध्ये दिसली कोविड-१९ ची लक्षणे
रविवारी सकाळी पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानला ताप आल्याने तो सरावासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्यामध्ये कोविड-१९ ची काही लक्षणे आढळून आली होती. ज्यामुळे त्याला टीम हॉटेलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली पुष्टी
या घटनेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृतरीत्या पत्रक काढून म्हटले आहे की, “शनिवारी केलेल्या कोविड-१९ चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह आले होते. मात्र, रविवारी सकाळी फखरमध्ये काही कोविड-१९ सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. संघाच्या हितासाठी त्याला इतरांपासून वेगळे ठेवण्यात येतेय. तो पाकिस्तान संघासह न्यूझीलंडला जाणार नाही. संघ व्यवस्थापनाने त्याच्याऐवजी बदली खेळाडूची मागणी केल्यास, तो खेळाडू संघासोबत पाठवला जाईल.”
१८ डिसेंबरपासून पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात होणार मालिका
पाकिस्तानचा संघ दुबईमार्गे ऑकलंडमध्ये दाखल होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान १८ डिसेंबरपासून तीन टी२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. पाकिस्तान संघाला टी२० मालिकेत फखरची उणीव भासू शकते. फखरने पाकिस्तानकडून आत्तापर्यंत ४ कसोटी, ४७ वनडे व ४० टी२० सामने खेळले आहेत. ज्यात त्याच्या नावे अनुक्रमे १९४, १,९६० व ८३८ धावा जमा आहेत. पाकिस्तानकडून वनडे क्रिकेटमध्ये एकमेव द्विशतक झळकावण्याचा मान फखरने मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
ऍडलेडमध्ये कोविड-१९ ची दुसरी लाट; ‘या’ स्टेडियमवर हलवली जावू शकते भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी
आनंदाची बातमी! कोविडच्या दुष्टचक्रातून वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची सुटका; मिळाली सरावाची परवानगी
कोविड १९ महामारीमुळे ‘या’ क्रिकेट बोर्डाला झाला तब्बल १० करोड पौंडचा तोटा