अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे वाहून गेल्यानं पाकिस्तान टी20 विश्वचषक 2024 मधून बाहेर पडला आहे. यासह यजमान अमेरिकेनं इतिहास रचत सुपर 8 मध्ये आपलं स्थान पक्क केलं.
टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानला दुहेरी धक्का बसला आहे. स्पर्धेतील सलामीच्या लढतीत झालेला अमेरिकेविरुद्धचा पराभव आता त्यांना पुढील दोन वर्ष सतावणार आहे. वास्तविक, 2024 टी20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये स्थान न मिळवू शकल्यामुळे पाकिस्तानला 2026 टी20 विश्वचषकात थेट प्रवेश मिळणार नाही. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 चा भाग होण्यासाठी पाकिस्तानला प्रथम क्वालिफायर सामने खेळावे लागतील. क्वालिफायर सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतरच पाकिस्तानला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मध्ये पोहोचलेल्या संघांना पुढील टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी थेट तिकीट मिळणार आहे. या लिस्टमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारख्या बड्या संघांसह आता अमेरिकेचं नावही समाविष्ट झालं आहे.
टी20 विश्वचषकातील अमेरिकेच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, यजमानांनी स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात कॅनडाविरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग करून विजय नोंदवला. यानंतर त्यांनी पाकिस्तानविरुद्ध मोठा अपसेट करून इतिहास रचला. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानं त्यांच्या सुपर 8 च्या आशा पल्लवित झाल्या. भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही अमेरिकेनं चांगली कामगिरी केली, मात्र ते विजय मिळवू शकले नाही. साखळी टप्प्यातील त्यांचा चौथा सामना आयर्लंडविरुद्ध होता, जो पावसामुळे वाहून गेला.
अमेरिकेचा संघ सुपर-8 च्या ग्रुप-2 मध्ये आहे. येथे त्यांचा सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकातून बाद होताच सौरभ नेत्रावळकरनं उडवली पाकिस्तानची खिल्ली, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द, सुपर 8 साठी अमेरिका क्वालिफाय
अफगाणिस्तानसह ‘हे’ संघ सुपर-8 साठी पात्र, न्यूझीलंड-श्रीलंका विश्वचषकातून आउट!