सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या साथीच्या आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका हा क्रीडाक्षेत्राला बसत असून, अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धा स्थगित कराव्या लागत आहेत किंवा रद्द केल्या जात आहेत. नुकतीच श्रीलंकेत होणारी नियोजित आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया चषक रद्द करण्यात आला. आगामी काही वर्ष ही स्पर्धा खेळविण्यात येणार नाही अशी चर्चा होत असताना, पुन्हा या स्पर्धेच्या आयोजनाविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
श्रीलंकेत होणारी स्पर्धा रद्द
मागील वर्षापासून पुढे ढकलली जात असलेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधवारी (१९ मे) जाहीर केले. सर्व संघांचे पुढील कार्यक्रम ठरले असल्याने आता ही स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकानंतरच आयोजित होऊ शकते असे म्हटले जात आहे. मागील वर्षीपासून दोनदा ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.
या ठिकाणी होऊ शकते स्पर्धा
श्रीलंकेत होणारी स्पर्धा रद्द झाली असली तरी, पुन्हा स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्पर्धेचे यजमानपद पूर्वी पाकिस्तानकडे होते. परंतु, कोरोनामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलून श्रीलंकेत घेण्याचे ठरलेले. आता ही शक्यतादेखील मावळल्यानंतर पुन्हा पुढील वर्षी पाकिस्तानच आशिया चषकाचे आयोजन करू शकते. ही स्पर्धा टी२० स्वरुपातील असेल. यानंतरच्या, २०२३ मधील वनडे स्वरूपाच्या आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेकडे दिले जाईल.
भारतीय संघ पाकिस्तानात जाईल का?
जर पुढील वर्षी पाकिस्तानात आशिया चषकाचे आयोजन झाल्यास भारतीय संघात त्यामध्ये सहभागी होईल का? यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण, दोन्ही देशांमधील राजकीय संबंध कमालीचे तनावाचे आहेत. ज्यामुळे भारत सरकारकडून खेळाडूंना पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. भारताने अखेरच्या वेळी पाकिस्तानचा दौरा २००५-२००६ साली केलेला. त्यानंतर, २००९ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय संघ पुन्हा पाकिस्तानात गेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉकडे या गोष्टीची कमी, पाकिस्तानच्या क्रिकेटरने लक्षात आणून दिली शॉची मोठी चूक






