पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पाणी पाजलं आहे. संघानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना 8 गडी राखून जिंकला. यासह पाकिस्ताननं ही मालिका 2-1 ने जिंकली. विशेष म्हणजे, मालिकेतील पहिला सामना पाकिस्ताननं गमावला होता. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत त्यांनी मालिका जिंकली. पाकिस्ताननं तब्बल 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत पराभूत केलं आहे.
मोहम्मद रिझवानची पाकिस्तानचा कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. या मालिकेपूर्वी बाबर आझमनं कर्णधारपद सोडल्यानंतर रिझवानला पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं मालिकेतील पहिला सामना गमावला होता. मात्र संघानं दुसरा सामना मोठ्या फरकानं जिंकत, तिसरा सामनाही जिंकला आणि मालिका खिशात घातली.
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्ताननं 27व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 141 धावांचं छोटं लक्ष्य गाठलं. या सामन्यात मोहम्मद रिझवाननं नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली होती. कर्णधाराचा हा निर्णय अगदी योग्य ठरला आणि ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 140 धावांत गडगडला. पाकिस्तानकडून केवळ चार गोलंदाजांनी गोलंदाजी केली.
शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाहनं प्रत्येकी 3 तर हरिस रौफनं 2 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून सीन ॲबॉटनं 30 आणि मॅथ्यू शॉर्टनं 22 धावा केल्या. याशिवाय एकाही कांगारु फलंदाजाला 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. पाकिस्तानकडून सॅम अयुबनं 42 धावा केल्या, तर अब्दुल्ला शफीकनं 37 धावांची खेळी केली. कर्णधार मोहम्मद रिझवान 30 धावा करून नाबाद माघारी परतला. तर बाबर आझमनं 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून लान्स मॉरिसनं 2 बळी घेतले.
हेही वाचा –
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू गुजरातमध्ये जाणार! मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीनं दिले संकेत
AUS vs PAK: पाकिस्तानी वेगवान आक्रमणासमोर ऑस्ट्रेलिया पुन्हा ढेर, 22 वर्षांनी मालिका जिंकली..!
अद्भुत! एका हातानं पकडला सीमारेषेकडे जाणार चेंडू, फलंदाजाचाही विश्वास बसेना; VIDEO पाहा