आतापर्यंत क्रिकेट जगतात अनेक विक्रम झाले आहेत आणि ते तुटलेही आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ठोकलेल्या शतकांचे शतक असो किंवा मग इतर कोणताही जागतिक विक्रम, एकेदिवशी सर्वच तुटणार आहेत. परंतु आयसीसीने नुकत्याच बनवलेल्या एका नियमामुळे पाकिस्तानचा फलंदाज हसन रझा या खेळाडूचा विक्रम आता अजरामर म्हणजेच भविष्यात कोणालाही मोडता येणार नाही.
खरं तर आयसीसीने नुकतीच घोषणा केली आहे की, आता कोणताही खेळाडू १५ वर्षांपेक्षा कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही. हा नियम महिला क्रिकेटसोबतच १९ वर्षांखालील क्रिकेटलाही लागू आहे. आयसीसी केवळ १५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या खेळाडूंनाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची परवानगी देणार आहे. केवळ संबंधित विशेष बोर्डाच्या परवानगीनेच कोणत्याही खेळाडूला कमी वयात खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
या नियमामुळे पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन रझाच्या पदार्पणाचा विक्रम अबाधित झाला आहे. रझाने १४ वर्षे आणि २७७ दिवसांच्या वयात झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या कसोटी संघात १९९६ साली पदार्पण केले होते.
बांगलादेशच्या एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना रझाने आयसीसीच्या या निर्णयाचे स्वागत केले. तो म्हणाला, “मी आयसीसीच्या या निर्णयाचे स्वागत करतो. माझा विक्रम कायम राहणार असल्यामुळे मी या निर्णयाचे स्वागत करत नाही. कारण कमी वयात खेळाडू मानसिकरीत्या परिपक्व नसतात.”
“जेव्हा मी पदार्पण केले होते, त्यावेळी वेस्ट इंडिज संघात घातक वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्शही खेळायचे. अशामध्ये एका युवा फलंदाजाला त्यांचा सामना करणे कठीण होऊ शकते,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरही सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा खेळाडू आहे. परंतु त्याचे वय १५ पेक्षा जास्त होते. त्याने १६ वर्षे आणि २०५ दिवसांच्या वयात पाकिस्तानविरुद्ध १९८९ साली पदार्पण केले होते.
हसन रझाने पाकिस्तान संघाकडून ७ कसोटी सामने आणि १६ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत २६.११ च्या सरासरीने २३५ धावा केल्या आहेत. सोबतच वनडेत त्याने १८.६१ च्या सरासरीने २४२ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ ३ अर्धशतके ठोकली आहेत.