कोरोना या साथीच्या आजारामुळे बरेच दिवस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नाही. त्यानंतर जवळपास ६ महिन्यानंतर सर्व खबरदारी घेऊन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. आयपीएल ही जगप्रसिद्ध टी२० स्पर्धाही जैव- सुरक्षित वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. यातच २६ नोव्हेंबर रोजी लंका प्रीमियर लीग या टी२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झालेल्या एका दिग्गज खेळाडूने श्रीलंकेला जाणारी फ्लाईट मिस केली. त्यामुळे तो या स्पर्धेत नियोजित वेळी सामील होऊ शकणार नाही.
आफ्रिदीने श्रीलंकेला जाणारी फ्लाईट केली मिस
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही या स्पर्धेत सहभागी होणार आहे. मात्र या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झालेला आफ्रिदी योग्य वेळी विमानतळ गाठू शकला नाही. त्यामुळे त्याच्या हातून श्रीलंकेला जाणारी फ्लाईट मिस झाली. अशा परिस्थितीत आता एलपीएलमध्ये गाले ग्लेडिएटर्स संघाचा कर्णधार असलेला आफ्रिदी पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
शक्य तितक्या लवकर स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रयत्न करेन- आफ्रिदी
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “आज सकाळी कोलंबोला जाणारी फ्लाईट मिस झाली. त्यात कोणतीही अडचण नाही. मी शक्य तितक्या लवकर लंका प्रीमियर लीगमध्ये जाण्याचा प्रयत्न करेन. मी लवकरात लवकर संघात सामील होण्यासाठी उत्सुक आहे.”
आफ्रिदीला क्वारंटाईन राहावे लागेल
कोरोना या साथीच्या आजारामुळे परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी कठोर नियम बनवले गेले आहेत. अशा परिस्थितीत श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर शाहिद आफ्रिदीला क्वारंटाईन राहावे लागेल.
…तर कर्णधारपदाची जबाबदारी भानुका राजपक्षेकडे सोपवण्यात येईल
जर शाहिद आफ्रिदी पहिल्या सामन्याला मुकला, तर गॅले ग्लेडिएटर्सचे संघ व्यवस्थापन भानुका राजपक्षेकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकते. सध्या तो संघाचा उपकर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या अनुभवी खेळाडूमध्ये आढळली कोविडची लक्षणे, न्यूझीलंड दौऱ्यातून पत्ता कट
“विराट शिवाय टीम इंडिया म्हणजे स्मिथ, वॉर्नर शिवाय ऑस्ट्रेलिया”