आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचण्यात पाकिस्तान क्रिकेट संघाला अपयश आले आहे. असे असताना आता पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात मोठे बदल होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (14 नोव्हेंबर) झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) बैठकीत संपूर्ण निवड समितीलाच बरखास्त करण्यात आले आहे. तसेच, नवीन नियुक्ती देखील करण्यात आल्या.
विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघावर टीकेची झोड उठत आहे. अखेरच्या सामन्यातील पराभवानंतर संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी राजीनामा दिला होता. पाकिस्तान संघ मायदेशात परतल्यानंतर पीसीबी अध्यक्ष झाका अश्रफ यांनी मंगळवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत इंझमाम उल हक यांच्या नेतृत्वातील निवडसमिती बरखास्त केली गेली. इंझमाम याने यापूर्वीच आपल्या या पदाचा राजीनामा दिला होता.
यासोबतच पाकिस्तान संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये असलेल्या सर्व विदेशी प्रशिक्षकांनाही नारळ देण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ऍंड्र्यू पुटीक यांच्या जागी माजी कर्णधार युनूस खान याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, निवडसमिती अध्यक्ष म्हणून माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
बाबरची गच्छंती अटळ
आफ्रिदी हा नवा निवडसमिती अध्यक्ष बनल्याने विद्यमान कर्णधार बाबर आझम याची कर्णधार पदावरून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता आहे. आफ्रिदी याने यापूर्वीच बाबर नेतृत्वासाठी योग्य व्यक्ती नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता वनडे व टी20 संघाचे नेतृत्व मोहम्मद रिझवान अथवा शाहीन आफ्रिदी यापैकी एक जण करताना दिसू शकतो.
(PCB Sacked Selection Committee Shahid Afridi Becomes New Selection Committee Chairman)
हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान