वेस्ट इंडीजचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू फिल सिमन्स यांना पुन्हा एकदा वेस्ट इंडीज क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. याआधीही सिमन्स यांनी वेस्ट इंडीजच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडीजने 2016 चा टी20 विश्वचषकही जिंकला होता.
पण सिमन्स यांना 2016 च्या टी20 विश्वचषकानंतर काही दिवसांनी या पदावरुन काढून टाकण्यात आले होते. पण आता पुन्हा त्यांना मुख्यप्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सिमन्स पुढील चार वर्षे वेस्ट इंडीज संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील, असे वेस्ट इंडीज क्रिकेटने सोमवारी( 14 ऑक्टोबर) सांगितले आहे.
”फिल सिमन्सने यांना पुन्हा बोलवून आम्ही फक्त आमची चूक दुरूस्त करत नसून, मला विश्वास आहे की वेस्ट इंडीज क्रिकेटने या पदावर योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड केली आहे. त्याचबरोबर मी फ्लॉइड रेफर यांचे आभार मानतो, त्यांनी प्रभारी प्रशिक्षक म्हणून खूप मेहनत घेतली.’
सिमन्स यांनी 2016 नंतर अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तान संघ 2019 विश्वचषकासाठी पात्र ठरले. मात्र मुख्य विश्वचषकात अफगाणिस्तानला विशेष कामगिरी करता आली नाही.
याशिवाय सिमन्स यांनी झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयर्लंडने मोठे यश मिळवले.
तसेच सिमन्स हे भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतही होते. परंतू मुलाखतीआधीच त्यांनी माघार घेतली होती. नंतर रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी फेरनिवड झाली.
आता सिमन्स वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक म्हणून पून्हा काम पाहणार असून 5 नोव्हेंबरपासून ते ही जबाबदारी सांभाळतील.
BREAKING: CWI APPOINTS PHIL SIMMONS AS NEW HEAD COACH OF WEST INDIES SENIOR MEN’S TEAM pic.twitter.com/BtmHBMEE8h
— Windies Cricket (@windiescricket) October 14, 2019






