भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पराभवाच्या गर्तेतून ऐतिहासिक कामगिरी करत सामना अनिर्णित राखला. भारतीय संघातील सर्वच फलंदाजांनी शेवटच्या डावात उत्तम फलंदाजी करत संपूर्ण जगाला आपले कौतुक करण्यास भाग पाडले आहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचे विशेष कौतुक झाले. अजिंक्यने दुसऱ्या व तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवताना संपूर्ण संघाला एकजुटीने मैदानात खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच भारतीय संघ पहिल्या सामन्यात 36 धावांवर बाद होऊनही मालिकेत पुनरागमन करू शकला. तिसर्या सामन्याच्या समाप्तीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजिंक्यने भारतीय संघाच्या रणनीतीचा खुलासा केला आहे.
अजिंक्य म्हणाला ,”शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी आम्ही संपूर्ण समर्पणाने शेवटच्या क्षणापर्यंत लढाई करण्याचे ठरवले होते. आमचे निकालाकडे लक्ष नव्हते. फक्त आजच्याच दिवशी नाही तर संपूर्ण सामन्यादरम्यान आम्ही जो संघर्ष केला त्याने निश्चितच आनंद होत आहे.ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्यांनी केवळ 2 गडी गमावत 200 धावा केल्या होत्या. या कठीण परिस्थितीतही आम्ही पुनरागमन करत त्यांना 338 धावांवर सर्वबाद केले.”
सामन्याच्या पाचव्या दिवशी सुरुवातीच्या सत्रांत चेतेश्वर पुजारा व रिषभ पंत यांनी व अंतिम सत्रांमध्ये हनुमा विहारी व आर अश्विनने उत्तम भागीदारी केली. विशेष म्हणजे विहारी व अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढत सामना अनिर्णित केला. अजिंक्यने पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या:
टीम इंडियाला मोठा धक्का! बॉर्डर-गावसकर मालिकेतून आणखी एक खेळाडू बाहेर
शर्यतीचा खेळ पडला महागात! पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकच्या कारचा अपघात
रिकी पॉंटिंगची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला भारतीय संघ ब्रिस्बेनला न जाण्याची कारणे शोधत आहे