भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान ऍडलेड येथील दिवस-रात्र कसोटीने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. हा कसोटी सामना दिवस-रात्र स्वरूपाचा असल्याने या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर होतोय. संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्यावर लागून राहिले आहे. कारण, उभय संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध गुलाबी चेंडूने सामना खेळत आहेत. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने म्हटले आहे की, कसोटी क्रिकेटचे सर्वच सामने गुलाबी चेंडूने खेळायला हवे. त्यामागे त्याने काही कारणेही त्याने सांगितली आहेत.
गुलाबी चेंडूने खेळले जावेत कसोटी सामने
ऑस्ट्रेलियासाठी ७०८ कसोटी बळी मिळवणाऱ्या वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये लालऐवजी गुलाबी चेंडूचा वापर केला जावा असे म्हटले आहे. वॉर्नने सांगितले, “मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे की, सर्व कसोटी सामने हे गुलाबी चेंडूने खेळले जावेत. दिवसाच्या सामन्यातही गुलाबी चेंडू वापरला जावा. गुलाबी चेंडू पाहण्यास सोपा जातो. हा चेंडू पाहायला खेळाडू आणि प्रेक्षक दोघांनाही बरे वाटते.”
वॉर्नने गुलाबी चेंडूविषयी सांगताना म्हटले, “गुलाबी चेंडू ६० षटकांनंतर मऊ होतो. त्यानंतर तो बदलला जावा. लाल चेंडू स्विंग होत नाही आणि त्यामुळे गोलंदाजांना मदतही मिळत नाही. इंग्लंडमध्ये वापरला जाणारा ड्युक चेंडू वगळता इतर चेंडू फारसे चांगले नाहीत.”
विराटचे बाद होणे दुर्दैवी
वॉर्नने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीमध्ये विराट कोहलीचे धावबाद होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. वॉर्न म्हणाला, “कोहलीसारखा खेळाडू धावबाद होणे दुर्दैवी होते. ही चाहत्यांसाठी निराश करणारी गोष्ट आहे. तो चांगल्या लयीमध्ये होता. त्याच्याकडून सर्वांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती.”
ऍडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट ७४ धावांवर धावबाद झाला. अजिंक्य रहाणेने चुकीचा कॉल दिल्याने कोहली वैयक्तिक ७४ धावांवर बाद झाला होता. यादरम्यान विराट चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. तो बाद झाल्यानंतर भारतीय संघाची धावगती मंदावली आणि दिवसाखेर भारताने ६ बाद २३३ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोणत्याही परिस्थितीत मला तिथे उपस्थित रहायचे आहे’, पालकत्व रजेवर बोलताना विराटचे वक्तव्य
दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी
ऑस्ट्रेलियात मैदान गाजवणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या घालवतोय पत्नीसोबत वेळ; फोटो व्हायरल