टी20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक वरिष्ठ खेळाडू संघात परतले असून, अनेक खेळाडूंना दमदार कामगिरी करूनही संघात स्थान मिळवता आलेलं नाही. जर तुम्ही 15 सदस्यीय भारतीय संघाकडे बारकाईनं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की निवडकर्त्यांनी आयपीएल 2024 मधील कामगिरीच्या आधारे संघाची निवड केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पाच खेळाडूंची लॉटरी लागली आहे.
शिवम दुबेचं नशीब उजळलं – आयपीएल 2024 मध्ये झंझावाती फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबेचा टी20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. दुबेची निवड केवळ त्याच्या आयपीएल कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दुबेनं 9 सामन्यात 172 च्या स्ट्राईक रेटनं 350 धावा कुटल्या आहेत.
संजू सॅमसनला संधी – संजू सॅमसनचा टी20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बघितला तर तो काही फारसा विशेष नाही. मात्र, संजू आयपीएल 2024 मध्ये बॅटनं धमाल कामगिरी करत आहे. या कामगिरीच्या आधारेच त्याची भारतीय संघात निवड झाली. संजूनं यंदाच्या आयपीएलमध्ये खेळलेल्या 9 सामन्यांत 161.09 च्या स्ट्राईक रेटनं 385 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं 4 अर्धशतकंही ठोकली आहेत.
युजवेंद्र चहलचे परिश्रम फळाला – भारतासाठी टी20 आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा युजवेंद्र चहल गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय टी20 संघात पुनरागमनाची वाट पाहत होता. चहलनं या मोसमात खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये एकूण 13 फलंदाजांना बाद केलं आहे. विकेट्स घेण्यासोबतच तो खूप किफायतशीरही ठरला आहे. त्यामुळेच निवड समितीनं त्याच्यावर विश्वास दाखवला.
रिषभ पंतनं केली फिटनेस सिद्ध – डिसेंबर 2022 मध्ये भीषण कार अपघात झाल्यानंतर रिषभ पंत तब्बल 17 महिन्यानंतर मैदानावर परतला आहे. आयपीएल 2024 मध्ये पंतनं केवळ त्याची तंदुरुस्तीच दाखवली नाही तर बॅटनंही भरपूर धावा गोळा केल्या. पंतच्या आयपीएलमधील दमदार कामगिरीनं त्याला टी20 विश्वचषकाचं तिकीट मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अर्शदीपनं जिंकला निवडकर्त्यांचा विश्वास – अर्शदीप सिंगनं देखील आयपीएल 2024 मध्ये आपल्या दमदार कामगिरीनं निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात यश मिळविलं. या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना अर्शदीपनं आतापर्यंत 9 सामन्यांत 12 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल 2024 मधील डेथ ओव्हर्समध्ये अर्शदीप पूर्वीपेक्षा चांगली गोलंदाजी करतोय, ज्याच्या आधारे त्याची विश्वचषकाच्या टीममध्ये निवड झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुलचं टी20 विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडलाही संधी नाही
कमबॅक असावा तर असा! 17 महिन्यांनंतर मैदानावर परतताच रिषभ पंतला थेट वर्ल्ड कपमध्ये संधी!
टी20 वर्ल्डकपसाठी ‘कुलचा’ संघात परतले, बुमराह-अर्शदीप-सिराज यांच्याकडे वेगवान माऱ्याची धूरा