पुणे। विवो प्रो कबड्डी लीगच्या पुणे टीमचे प्रतिनिधीत्व करणा-या पुणेरी पलटनच्या खेळाडूंनी नुकतेच त्यांच्या दोन चाहत्यांना त्यांच्या घरी भेट देत अचंबित केले. पुणेरी पलटनचे निस्सीम चाहते रोहित चव्हाण आणि प्रणय शिंदे आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटून खूपच आनंदित झाले.
त्यांना भरपूर आनंद झाला आणि ते त्यांना मिळालेल्या या गोड सरप्राईजचा आनंद लपवू शकले नाहीत. पुणेरी पलटनने त्यांच्या सोशल मीडिया व्यासपीठांवर राबवलेल्या एका स्पर्धेच्या माध्यमातून या दोन भाग्यवान चाहत्यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये सहभागींना त्यांच्या घरांमध्ये गणपती बाप्पाच्या आरास केलेल्या सुंदर सजावटींची चित्रे शेअर करण्यास सांगण्यात आले. पुणेरी पलटनचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असल्यामुळे अनेक उत्साही चाहत्यांनी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद दिला.
रविवार पेठमध्ये राहणारा पुणेरी पलटनचा निस्सीम चाहता रोहित चव्हाणला मनजीत आणि दर्शन यांनी भेट दिली. पुणेरी पलटनमधील आपले दोन आवडते खेळाडू भेट द्यायला येणार असल्याचे समजल्यानंतर या २३ वर्षीय चाहत्याला खूपच आनंद झाला. त्याला खेळाडूंसोबत या खेळाबाबत सविस्तर चर्चा करायला मिळाली आणि खेळाची माहिती देखील मिळाली. तसेच त्याला त्यांच्याकडून कबड्डी खेळाचे डावपेच देखील समजले. खेळाडूंनी उर्वरित टीमसोबतचे काही रोचक किस्से आणि पडद्यामागील कथा देखील शेअर केल्या.
आणखी एक भाग्यवान होता कोंढवामध्ये राहणारा प्रणय शिंदे, ज्याला संदीप व अमित कुमार यांनी भेट दिली. प्रणय आणि त्याचे संपूर्ण कुटुंब पलटन संघाचे निष्ठावंत चाहते आहेत आणि ते संघाच्या पुण्यात खेळण्यात येणा-या सामन्याची आतुरतेने वाटत पाहत आहे. खेळाडूंना भेटून त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची संधी मिळाल्याने ते खूपच आनंदित झाले. या कुटुंबाने खेळाडूंचे हार्दिक स्वागत केले. त्यांनी खेळाडूंना काही स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ व मिष्टान्नांचा आस्वाद दिला.
आनंदित चाहत्यांनी या संस्मरणीय क्षणांचा संग्रह करण्यासाठी खेळाडूंसोबत सेल्फीज व फोटो देखील काढले. निस्सीम चाहते असलेल्या रोहित आणि प्रणयने टीमला अनोखी भेटवस्तू दिली. खेळाडूंनी देखील या दोघांना पुणेरी पलटन मर्चंडाइज असलेली गुडी बॅग दिली.
याप्रसंगी बोलताना मनजीत म्हणाला, ”आमचे चाहते आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असलेले पाहून खूपच छान वाटत आहे. आमचे चाहते आमच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि त्यांना भेटण्याचा क्षण आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक होता. प्रेम, आनंद व उत्साहाने आमचे करण्यात आलेले स्वागत अत्यंत आनंददायी होते. रोहितने आम्हाला त्याने बनवलेली सुंदर चित्रे भेट म्हणून दिली. आमच्या लाडक्या चाहत्यांना भेटून त्यांच्यासोबत गप्पा मारण्याचा अनुभव नेहमीच आनंददायी असतो. त्यांचा सातत्याने मिळणारा पाठिंबा आणि प्रेम आम्हाला अधिक उत्तमप्रकारे कामगिरी करण्याची प्रेरणा देतात.”
याप्रसंगी बोलताना रोहित म्हणाला, ”मी पुणेरी पलटनचा निस्सीम चाहता आहे आणि माझ्या आवडत्या खेळाडूंनी भेट दिल्यामुळे माझे स्वप्न सत्यात अवतरल्याप्रमाणे आहे. हा दिवस कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहिल. मी हा दिवस कधीच विसरणार नाही. मनजीत आणि दर्शन यांच्यासोबत गप्पा करण्याचा अनुभव अद्वितीय होता. ते अत्यंत विनम्र आहेत आणि इतक्या उंचीवर पोहोचून देखील त्यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत. मी पुणे सामन्यांसाठी त्यांना आणि संपूर्ण पुणेरी पलटन टीमला शुभेच्छा देतो.”