भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (१८ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर हा सामना जिंकून मालिकेत टिकून राहण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे विराट कोहली या सामन्यासाठी प्लेईंग ११ मध्ये कोणाला संधी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सामन्यात आयपीएल २०२० स्पर्धेत धुमाकूळ घातलेल्या अष्टपैलू खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.
सलामीवीर
कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माला पहिल्या २ सामन्यात संघाबाहेर ठेवले होते. मात्र तिसऱ्या सामन्याद्वारे रोहितने भारतीय टी२० संघात पुनरागमन केले. परंतु त्याला मोठी आकडी धावसंख्या करता आली नाही. तरीही या सामन्यात रोहितला संधी दिली जाऊ शकते. तर या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलेला केएल राहुल या सामन्यातदेखील भारतीय संघासाठी रोहित शर्मासोबत मिळून डावाची सुरुवात करू शकतो. कारण कर्णधार विराटने तिसऱ्या सामन्यातील परभवानंतर म्हटले होते की, केएल राहुल संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे.
मध्यक्रम
तिसऱ्या टी -२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने आपले स्थान युवा फलंदाज इशान किशनला दिले होते. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकांवर फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यातदेखील असेच चित्र पाहायला मिळू शकते. तसेच मध्यक्रमात श्रेयस अय्यर खेळणार हे जवळपास ठरल्यात जमा आहे.
अष्टपैलू खेळाडू/ यष्टीरक्षक
भारतीय संघासाठी लांब लांब षटकार मारणारा फलंदाज रिषभ पंत या सामन्यातदेखील यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून येणार आहे. तसेच या सामन्यात आयपीएल २०२० स्पर्धेत धुमाकूळ घातलेला अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया पदार्पण करू शकतो. याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर संघात कायम असतील.
गोलंदाज
चौथा टी -२० सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजांवर, इंग्लंड संघाचा डाव कमी धावांमध्ये आटोपण्याची जबाबदारी असणार आहे. पहिल्या ३ सामन्यात गोलंदाजीमध्ये निराशाजनक कामगिरी करणारा युजवेंद्र चहल या सामन्यात बाहेर होऊ शकतो. त्याच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात येऊ शकते. तसेच शार्दुल ठाकूरने देखील मागील सामन्यात ३.२ षटक गोलंदाजी करत ३६ धावा दिल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात दीपक चाहरला पदार्पण करण्याची संधी देण्यात येऊ शकते.
असा असू शकतो भारतीय संघ –
रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, राहुल तेवतिया, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, दीपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ साठी ‘मिस्टर आयपीएल’ने कसली कंबर, पाहा त्याची जोरदार फटकेबाजी
कारकिर्दीत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात एकतरी झेल घेणारा भारतीय दिग्गज






