गळ्यात चांगली जाडसर ५० तोळ्याची सोन्याची चैन. अंगात टीम इंडियाची ब्लू जर्सी. बऱ्यापैकी वाढलेली अन् पांढरी झालेली दाढी. फिल्डरने मिस फिल्ड केल्यावर दोन्ही हात कमरेवर ठेवत, नाराजी दाखवत कपाळावर आठ्या आणि विकेट घेतल्यावर खळखळून आलेलं हसू. असं व्यक्तिमत्व क्रिकेटच्या ग्राउंडवर एकच होतं ते म्हणजे प्रवीण कुमार. इंडियन क्रिकेटमधील एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा काळ ज्याने आपल्या बॉलिंगने गाजवला तो प्रवीण कुमार.
४ मार्च, २००८चा हा दिवस भारतीय क्रिकेटला दिशा देणारा आणि प्रवीण कुमारला ओळख देणारा बनणार होता. सीबी सिरीजच्या बेस्ट ऑफ थ्री फायनलपैकी ती दुसरी फायनल. पहिली फायनल हरल्याने, ऑस्ट्रेलिया काहीही करून जिंकायचे या इराद्याने खेळणार होती, पण त्यांच्या सर्व इराद्यांना, आशा-आकांक्षाना आणि नियोजनाला सुरुंग लावला प्रवीण कुमारने. गिलख्रिस्ट, पॉंटिंग आणि क्लार्क हे ऑस्ट्रेलियन बॅटिंगचे तीन स्तंभ पहिल्या ९ ओव्हरमधेच त्याने पाडले. ऑस्ट्रेलियन टीमने जोर लावला पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. टीम इंडियाने, धोनीने सुवर्णक्षरी इतिहास रचला आणि त्या इतिहासात सर्वात मोठा वाटा उचलला प्रवीण कुमारने.
हेही पाहा- त्यादिवशी रिव्हॉल्वर घेऊन प्रवीणकुमार जीवन संपवायला गेलता
मेरठच्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या घरात जन्मलेला प्रवीण पहिल्यापासूनच जिद्दी अन हट्टी. याच हट्टाने त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि मोठे नाव कमावले. धोनीने जेव्हा २०११ वर्ल्डकपचा प्लॅन बनवायला सुरुवात केली, त्यात प्रवीणला जागा होती. प्रवीण २००८ ते २०१० मध्ये टीम इंडियाचा सर्वात यशस्वी बॉलर होता. तो वर्ल्डकपसाठी सिलेक्टही झाला, पण त्याचं खोटं नशीब आडव आलं आणि दुखापतीमुळे तो टीमच्या बाहेर झाला. या गोष्टीचं आजही प्रवीणला वाईट वाटतं.
खरंतर वर्ल्डकप नंतरच त्याचा बॅडपॅच सुरू झाला. टीम इंडियातील जागा कायमची गेली. दोन वर्षात आयपीएलमध्ये कोणी विचरेना झाले. २०१४ ला तो अनसोल्ड गेला पण रोहित शर्मानं दोस्तीचा फर्ज निभावला, आणि जहीर एंजर्ड झाल्यावर त्याला मुंबई इंडियन्समध्ये सामील करून घेतले. पुढे आणखी दोन-तीन वर्षे खेळत तो आयपीएलमधून गायब झाला तो कायमचाच.
प्रवीण जेवढे दिवस क्रिकेट खेळला तेवढे दिवस तो वादातच राहिला.. २०१३ कार्पोरेट कपच्या मॅचमध्ये अजितेश अर्गळला शिव्या दिल्याने मॅच रेफ्रीने तर त्याच्यावर सरळ ‘मानसिदृष्ट्या असंतुलित’ असल्याचा शिक्का मारला. इतकंच काय तर २००८ ला त्याने एका डॉक्टरला मारहाण केलेली. अपोजिट टीमच्या फॅन्ससोबत तर त्याचं नेहमीच वाजायचं. लाईव्ह मॅचमध्ये त्याने शिव्या दिलेली उदाहरणे तर कित्येक सापडतील. त्याच्या ज्या सोन्याच्या चैनीची चर्चा व्हायची ती चैनही २०१३ ला हरवली, तेव्हा तिची किंमत होती ८ लाख. २०१९ ला त्याने वास्तवमधल्या संजय दत्तसारखी ५० तोळ्याची चैन करून सोशल मीडिया पोस्ट टाकली. पचास तोला पचास तोला.
सन २०१९ चा विषय निघालाच आहे, तर प्रवीणच्या आयुष्यातील सर्वात वाईट घटनेचा उल्लेख करावा लागेल. आपल्याच व्यसनाला आणि डिप्रेशनला कंटाळलेल्या प्रवीणने एक दिवस रिवॉल्वर घेतली, आणि स्वतः गाडी चालवत हायवेला पोहोचला. आपले जीवन संपवायला, पण गाडीत आपल्याच मुलांचा फोटो बघून त्यान विचार बदला. ज्या प्रवीणला आधीपासूनच साऱ्यांनी बदनाम केलं तो प्रवीण, उत्तर प्रदेशच्या युवा क्रिकेटरना स्पॉन्सर करतो, त्यान दहा मुलींची लग्न लावून दिलीत. आपल्याबद्दल लोक काय म्हणतात याचं स्पष्टीकरण देताना तो सांगतो, “इंडिया मे बस हवा चलती है… एक बार अच्छी चली तो अच्छी… और बुरी चल तो बुरी… मेरी हवा गलत बनी थी…”
आता प्रवीणचा वाईट काळ मागे पडलाय. तो डिप्रेशनमधून बाहेर आलाय. त्याला टीम इंडियाचा बॉलींग कोचही व्हायचंय. सुसाईडच्या निर्णयावेळी त्याने स्वतःलाच समजावलं होतं तसं, “कोई नही पिके फिर वापस आयेगा,” असं म्हणत तो नक्कीच मेनस्ट्रीम क्रिकेटमध्ये पुन्हा येईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लंबूजी! क्रिकेटच्या मैदानावर ‘या’ खेळाडूंच्या उंचीचीच रंगते चर्चा, ‘टॉप’ला फक्त पाकिस्तानी क्रिकेटर