जयपूर, २२ जून २०२३ : महाराष्ट्र आयर्नमॅन संघाच्या प्रीमिअर हँडबॉल लीगमधील विजयी घोडदौडला गुरूवारी ब्रेक लागला. यजमान राजस्थान पॅट्रीओट्स संघाविरुद्धच्या सामन्यात कडवी टक्कर देऊनही महाराष्ट्र आयर्नमॅन संघाला ३५-३० असा पराभव पत्करावा लागला. उभय संघांमध्ये २४ जून २०२३ ला पहिली उपांत्य फेरीची लढत होणार आहे.
इगोर चिसेलिओव्ह, जलाल कियानी आणि सुमीत कुमार यांनी सुरुवातीपासूनच आक्रमण खेळ करताना संघाला आघाडी मिळवून दिली. पॅट्रीओट्सनेही सामन्यात पुनरागमन केले आणि याचे श्रेय त्यांचा कर्णधार व गोलरक्षक अतुल कुमार याने केलेल्या अप्रतिम बचावाला जाते. हॅप्पी सिंगनेही पॅट्रीओट्ससाठी महत्त्वाची कामगिरी बचावताना आयर्नमॅनच्या आक्रमणपटूंना त्याने रोखले. पहिल्या १५ मिनिटांत आयर्नमॅनने ७-६ अशी आघाडी मिळवली.
आयर्नमॅनने रणनीतीत चांगले डावपेच आखले अन् जलालला अधिकाधिक संधी निर्माण करून दिल्या. त्यानेही त्याचं सोनं केलं. चिसेलिओव्ह, सुमित कुमार आणि अमन यांनी सावध खेळावर अधिक भर देताना चांगली साथ दिली. दुसरीकडे पॅट्रीओट्सच्या दिमित्री किरीव्ह, मनिष मलिक, अमरिंदर सिंग आणि विशेषतः हॅप्पी सिंग यांनी एकत्रितपणे चांगला खेळ करताना गोलसपाटा लावला.
पॅट्रीओट्सने आघाडी घेतली आणि त्यांनी आयर्नमॅनला बॅकफूटवर फेकण्यास सुरुवात केली. पहिल्या हाफमध्ये राजस्थानच्या संघाने १८-१६ अशी आघाडी घेण्यात यश मिळवले. दुसऱ्या हाफमध्ये पॅट्रीओट्स त्याच जोशात खेळले. दुसऱ्या हाफच्या मध्यंतरापर्यंत पॅट्रीओट्सने त्यांची आघाडी ३०-२२ अशी भक्कम केली. आयर्नमॅनकडून सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न होत होता, परंतु त्यांना पराभव टाळता आला नाही. कियानी आणि चिसेलिओव्ह यांनी उपांत्य फेरीच्या लढतीसाठी फ्रेश राहता यावे यासाठी विश्रांती दिली गेली, परंतु त्यांच्याशिवायही आयर्नमॅनने दुसऱ्या हाफमध्ये कडवी टक्कर दिली.
सुमित कुमारने सातत्याने गोल केले, परंतु सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. एकिकडे आयर्नमॅनचा संघ गोल्स करताना संघर्ष करताना दिसले, तर पॅट्रीओट्सच्या अल-ओताबी आणि मनिष मलिक हे सहज गोल करताना दिसले. शेवटच्या १० मिनिटांत पॅट्रीओट्सने मोठी आघाडी कायम राखली अन् सामना ३५-३० असा जिंकला. हॅप्पी सिंगने सर्वाधिक ८ गोल्स केले, तर जलाल कियानीने महाराष्ट्र आयर्नमॅनसाठी ७ गोल्स केले. दिमित्री किरीव्हला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविले गेले. (Premier Handball League । Maharashtra Ironman’s tough fight, but Rajasthan Patriots win)
अंतिम गुण – राजस्थान पॅट्रीओट्स ३५ वि. वि. महाराष्ट्र आयर्नमॅन ३०
महत्वाच्या बातम्या –
MPL 2023 । प्लेऑफमधील शेवटच्या स्थानासाठी ‘असे’ आहे समिकरण! पुणेरी बाप्पाचे पारडे जडच
‘देव आपल्याला वाचवणार नाही म्हणत,’ धोनीने खेळाडूंना केले प्रोत्साहित; मग काय भारत बनला चॅम्पियन