भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने गेल्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेतून त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. त्यानंतर त्याने आपल्या चुका सुधारत विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएल २०२१ स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले होते. आता तो लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अशातच भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटूने पृथ्वी शॉबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये आकाश चोप्राने पृथ्वी शॉला भारतीय संघात स्थान द्यावे म्हटले आहे. त्याच्या मते पृथ्वी शॉला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिले गेले पाहिजे. त्याने म्हटले की, “जर तो असाच फलंदाजी करत राहिला तर, मला असे वाटते की, त्याला भारतीय संघात स्थान दिले गेले पाहिजे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण त्याने जो फॉर्म दाखवला आहे आणि त्याने केलेल्या धावा खरोखरच भरपूर आहेत.”
पृथ्वी शॉने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या कामगिरीबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी तर आधीच म्हटले होते की, पृथ्वी शॉ या स्पर्धेतील एक शोध असेल. आयपीएल स्पर्धेत त्याचा स्ट्राइक रेट उल्लेखनीय असेल. ज्याप्रकारे,त्याने फलंदाजी केली आहे, म्हणजे ७ चेंडूत ६ चौकार मारणे सोपी गोष्ट नाहीये.”
पृथ्वी शॉ ची आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
आयपीएल २०२१ स्पर्धेत युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. आयपीएल २०२१ स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या गुणतालिकेत १२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत ८ सामने खेळले. यात त्याने ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले तर, २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच पृथ्वी शॉने या ८ सामन्यात ३८ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या होत्या. यात ८२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: अवघ्या १० धावांवर १० विकेट्स, त्यातही हॅट्रिक घेणारे अवलिया; वाचा त्यांच्याविषयी
कसोटी चॅम्पियनशीप फायनल अनिर्णीत किंवा ड्रॉ झाली तर कोण असणार विजेता? घ्या जाणून






