हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडिज संघात रविवारी(14 आॅक्टोबर) पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 10 विकेट्सने विजय मिळवला. तसेच पहिला सामनाही भारताने एक डाव आणि 272 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे भारताने दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विंडिजला व्हाईटवॉश दिला आहे.
या मालिकेनंतर आयसीसीने आज (15 आॅक्टोबर) कसोटी क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत भारताचे रिषभ पंत, पृथ्वी शॉ, उमेश यादव यांनी मोठी झेप घेतली आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम राहिला आहे.
फलंदाजांच्या या क्रमवारीत पृथ्वी शॉ पहिल्या सामन्यात केलेले शतक आणि दुसऱ्या सामन्यातील 103 धावांच्या जोरावर 13 स्थानांची झेप घेत 465 गुणांसह 60व्या क्रमांकावर आला आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभने दोन्ही सामन्यात प्रत्येकी 92 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळींमुळे त्याने 23 स्थानांची प्रगती करत 62 वे स्थान मिळवले आहे.
तसेच अजिंक्य रहाणे पहिल्या 20 फलंदाजांमध्ये आला असून त्याने 18 वे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर विंडिजचा क्रेग ब्रेथवेटची मात्र घसरण झाली आहे. तो आता 20 व्या स्थानावर आला आहे.
तसेच दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात शतक करणारा विंडिजचा फलंदाज रोस्टन चेसनेही 10 स्थानांची झेप घेत 31 वे स्थान मिळवले आहे.
त्याचबरोबर विंडिजकडून दुसऱ्या सामन्यात जेसन होल्डरने फलंदाजी तसेच गोलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. त्याने गोलंदाजी करताना भारताच्या पहिल्या डावात 5 विकेट घेण्याचाही पराक्रम केला. त्याच्यासाठी हे संपुर्ण वर्ष यशस्वी ठरले आहे. त्याने या वर्षात कसोटीत चौथ्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.
त्याच्या या कामगिरीमुळे त्याने गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या 10 जणांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता कारकिर्दीतील सर्वोत्तम 766 गुणांसह 9 व्या क्रमांकावर आला आहे.
याचबरोबर दुसऱ्या कसोटीत 10 विकेट घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवनेही गोलंदाजी क्रमवारीत 4 स्थानांची प्रगती करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम 613 गुणांसह 25 वे स्थान मिळवले आहे.
महत्वाच्या बातम्या-
–Video: विराट कोहली आणि कंपनीने तीव्र उन्हापासून बचावासाठी घेतला ‘आईस बाथचा’ आनंद
–या कारणामुळे भुवनेश्वर कुमार माध्यमांवर बरसला
–अबब! अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूने मारले एकाच ओवरमध्ये 6 षटकार