इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या धर्तीवर पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग (PSL) सुरू करण्यात आली. तेव्हापासून दोन्ही देशांच्या लीगची वेळोवेळी तुलना केली जाते. पाकिस्तानचा प्रयत्न नेहमीच पीएसएलला आयपीएलपेक्षा चांगलं चित्रित करण्याकडे असतो. पीएसएल 2024 चा अंतिम सामना सोमवारी (18 मार्च) रात्री उशिरा खेळला गेला. तेव्हापासून या लीगची बक्षीस रक्कम हा चर्चेचा विषय राहिला आहे.
पीएसएल 2024 चा अंतिम सामना शादाब खानची टीम इस्लामाबाद युनायटेड आणि रिझवानची टीम मुलतान सुलतान यांच्यात खेळला गेला. जेतेपदाच्या लढतीत इस्लामाबादनं शेवटच्या चेंडूवर मुलतानचा तीन गडी राखून पराभव केला. इस्लामाबादनं सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 160 धावांचं लक्ष्य गाठलं.
जे लोक वेळोवेळी पीएसएलची तुलना आयपीएलशी करतात त्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, पाकिस्तान सुपर लीगची बक्षीस रक्कम महिला आयपीएल म्हणजेच महिला प्रीमियर लीगपेक्षाही कमी आहे! शादाब खानच्या संघाला पीएसएल 2024 चं विजेतेपद जिंकल्यानंतर आरसीबी महिला संघापेक्षा कमी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली.
इस्लामाबाद युनायटेडला पीएसएल 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर सुमारे 4.13 कोटी रुपये मिळाले. तर आरसीबी महिला संघाला WPL चॅम्पियन बनण्यानंतर 6 कोटी रुपये मिळाले. गेल्या वर्षी आयपीएल 2023 चं विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला 20 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं होतं. म्हणजेच आयपीएलची बक्षीस रक्कम पीएसएलच्या बक्षीस रकमेपेक्षा जवळपास पाचपट जास्त आहे.
पीएसएल 2024 उपविजेत्या मुलतान सुलतान्सला सुमारे 1.65 कोटी मिळाले. तर आयपीएल 2023 उपविजेत्या गुजरात टायटन्सला 12.5 कोटी रुपये मिळाले होते. महिला प्रीमियर लीगबद्दल बोलायचं झालं तर, उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला सुमारे 3 कोटी रुपये मिळाले आहेत.
अंतिम सामन्याबाबत बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करताना मुलतान सुलतान संघानं 20 षटकात 9 गडी बाद 159 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इस्लामाबाद युनायटेडला शेवटच्या षटकात 8 धावांची गरज होती. यावेळी इमाद वसीम आणि नसीम शाह क्रीजवर होते. दोघांनी मिळून 4 चेंडूत 7 धावा केल्या. आता 2 चेंडूत 1 धावांची गरज होती. तेव्हा क्रीजवर असलेला नसीम शाह पाचव्या चेंडूवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी हुनैन शाहला 1 चेंडूवर 1 धाव काढायची होती. मात्र त्यानं सरळ चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी जानेवारीतच तंदुरुस्त झालो होतो, परंतु….”; ठीक होऊनही एकही सामना का खेळला नाही हार्दिक पांड्या?
पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप! लाइव्ह मॅचदरम्यान सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल
IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मुंबईचा राजा संघात दाखल, पाहा व्हिडिओ