येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 ला सुरुवात होणार आहे. यासाठी अनेक खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. या यादीत हार्दिक पांड्याचाही समावेश आहे.
हार्दिक पांड्याला 2023 विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो अनेक महिने टीम इंडियातून बाहेर राहिला. पण आता तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याआधी हार्दिक पांड्यानं एक मोठं विधान केलं. आपण आधीच तंदुरुस्त झालो असल्याचं हार्दिकनं सांगितलं, परंतु तो काही कारणास्तव भारताकडून सामने खेळत नव्हता.
हार्दिक पांड्या म्हणाला, “मी गोलंदाजी करत होतो. वर्ल्डकपमध्ये मला झालेली दुखापत फारशी वेदनादायी नव्हती. याचा माझ्या आधीच्या दुखापतीवर काही फरक पडला नाही. माझ्या फिटनेसवरही कोणताच परिणाम झाला नाही. जेव्हा मी तंदुरुस्त झालो तेव्हा जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका सुरू झाली. मी त्यावेळी तंदुरुस्त झालो. पण त्यानंतर एकही सामना झाला नाही. यामुळे मी खेळू शकलो नाही.”
हार्दिक पांड्याच्या आयपीएलमधील कामगिरी बोलायचं झालं तर ती अप्रतिम आहे. तो गेल्या 2 वर्षांपासून गुजरात टायटन्सचा भाग होता. 2022 मध्ये त्यानं संघाला आपल्या पहिल्या हंगामातच चॅम्पियन बनवलं. तर 2023 मध्ये त्याच्या नेतृत्वात गुजरातची टीम अंतिम फेरीत पोहचली. मात्र, एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं फायनलमध्ये गुजरातचा पराभव केला. यंदा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
हार्दिक पांड्यानं भारतासाठी आतापर्यंत एकूण 92 टी-20 सामने खेळले. या कालावधीत त्याच्या बॅटमधून एकूण 1348 धावा निघाल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 71 तर सरासरी 25 च्या आसपास आहे. गोलंदाजी करताना हार्दिकनं 92 सामन्यांच्या 82 डावात एकूण 73 बळी घेतले. आतापर्यंत त्याला एकाही सामन्यात 5 बळी घेता आलेले नाहीत.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हार्दिकची जुनी टीम गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. 24 मार्च रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा सामना खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरला मिळाली आयपीएल खेळण्याची परवानगी, मात्र ‘या’ खास गोष्टीची घ्यावी लागेल काळजी
बीसीसीआयला मिळाला अय्यर-किशनला पर्याय! केंद्रीय करारात दोन युवा क्रिकेटपटूंचा समावेश
पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप! लाइव्ह मॅचदरम्यान सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल