मुंबई: एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लिगच्या मोसमात प्रथमच बाद फेरीतील स्थान नक्की केले आहे. रविवारी घरच्या मैदानावर एफसी गोवा संघाविरुद्ध मोसमातील सर्वांत खराब पराभव पत्करावा लागल्यानंतरही त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की झाला.
पुण्याला श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर गोव्याकडून 0-4 असे पराभूत व्हावे लागले. आधीच्या प्रभावी कामगिरीमुळे मात्र त्यांना अखेरच्या लढतीत एक गुण मिळविण्यासाटी वाट पाहावी लागणार नाही. इतर निकाल कसेही लागले तरी पुणे पहिल्या चार संघांमध्ये येईल. 2014 पासून प्रथमच बाद फेरी गाठणे क्लबसाठी आनंददायक ठरेल.
पुणे सिटीचे प्रशिक्षक रँको पोपोविच म्हणाले की, क्लब म्हणून आम्हाला प्रथम हा टप्पा पार करायचा होता आणि बाद फेरी गाठायची होती. याच एका ध्येयासाठी संपूर्ण संघाने सातत्याने सराव केला. क्लबचा घटक असलेल्या प्रत्येकाच्या परिश्रमाचे हे फळ आहे, पण आमच्या मोहीमेचा हा शेवट नाही, तर सुरवात आहे. अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी एका वेळी एक पाऊल टाकण्याची आम्हाला आशा आहे.
पुणे सिटी 29 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेवढेच गुण राहिले तरी ते पहिल्या चार जणांत येतील. चार संघ लीगची सांगता 29 गुणांवर करण्याची शक्यता आहे. दिल्लीकडून पुणे हरल्यास, मुंबईकडून चेन्नई हरल्यास, गोव्याविरुद्ध जमशेदपूर जिंकल्यास आणि मुंबईने सलग दोन विजय मिळविल्यास असे होऊ शकते.
गुणांची बरोबरी झाल्यास एकमेकांविरुद्धची कामगिरी विचारात घेतली जाईल. आताच्या स्थितीनुसार या सर्व संघांविरुद्ध पुण्याची कामगिरी 12 गुणांसह सरस ठरेल. मुंबई आणि जमशेदपूरविरुद्ध पुण्याने प्रत्येकी दोन विजय मिळविले आहेत. त्याचवेळी चेन्नईयीन आणि जमशेदपूर यांना सुद्धा आगेकूच करता येईल.
एटीकेला आणि जमशेदपूरला हरवून गोव्याने शेवटचे दोन सामने जिंकल्यास गोवा 30 गुणांसह पुढे जाऊ शकतो. तसे झाल्यास तीन संघांचे 29 गुण होतील. त्यानंतरही पुणे आगेकूच करेल.
पुण्याची शुक्रवारी दिल्लीविरुद्ध लढत आहे. त्यावेळी कर्णधार मार्सेलिनीयो आणि दिएगो कार्लोस निलंबनामुळे खेळू शकणार नाहीत.