---Advertisement---

युवा क्रीडा पत्रकारानं उधळला विजयी गुलाल! तालुक्यात एकच चर्चा, दुप्पट वयाच्या उमेदवाराला चीतपट केलंय पोरानं

On: बुधवार, जानेवारी 20, 2021 9:56 PM
---Advertisement---

महाराष्ट्रातील १४ हजार २२८ ग्रामपंचायतींच्या निवडणूकींचा निकाल दिनांक १८ जानेवारी रोजी जाहीर झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यात विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. मात्र, या विजयाच्या जल्लोषात गुलालात न्हावून निघालेला एक जेता उमेदवार आता सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

पुणे जिल्हा हा तसा राजकारण्यांचा जिल्हा. त्यातही सासवड, पुरंदर, बारामती, मावळ, मुळशी हे तालुके तर अगदी पुढाऱ्यांचे तालुके म्हणूनच ओळखले जातात. अशाच पारंपारिक राजकारणाचं मैदान असलेला पुरंदर तालुका अन् या तालुक्यातील पिसर्वे गाव सध्या चर्चेत आलं आहे. आणि या चर्चेचं कारण म्हणजे, नुकताच ग्रामपंचायत निवडणूकीत विजयश्री मिळवलेला गावातील युवक ‘कु.महेश गौतम वाघमारे’.

पेशानं क्रीडा पत्रकार असलेल्या महेशने यंदा गावच्या निवडणूकीत उभे राहण्याचं ठरवलं होतं. ‘महा स्पोर्ट्स’ या क्रीडा क्षेत्रातील मराठी भाषेतील नामांकीत वेब पोर्टलमध्ये एक वृत्त संपादक म्हणून महेश कार्यरत आहे. परंतू, वर्षानुवर्षे गावातील रखडलेली विकासकामे पुर्ण करावी, गावाला विकासाच्या वाटेने पुढे न्यावे आणि सर्वसामान्यांना त्यांच्या हक्कांच्या जाणीवांसह प्रगतीच्या मार्गी लावावे, अशा विधायक ध्येयाने निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचं महेशने ठरवलं होतं.

Pune District Purandar Taluka Pisarve Gram Panchayat Election Result Mahesh Waghmare Winning Candidate Special Story
Pisarve Gram Panchayat Election Mahesh Waghmare Winning Candidate Special Story

राजकारणाचा कुठलाही कौटुंबिक वारसा नसलेला महेश हा शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य तरूण. त्यानं निवडणूकीत उभे राहणे हे खरे तर धाडसाचे होते. परंतू, घरातील सदस्यांनी गावच्या विकासासाठी मुलाला पुढे जाण्यापासून न रोखता विचारांची आधुनिकता कृतीतून दाखवून दिली. तिथेच खरे तर त्याला विजय मिळाला होता.

राजकारण म्हटलं की वाद-विवाद, शोध-प्रतिशोध, शह-प्रतिशह आलाच. परंतू, विचारांची शुद्धता असलेल्या महेशने त्याच्या कल्पना लोकांपर्यंत स्वतः जाऊन पोहोचवल्या. प्रत्यक्ष जनतेशी चर्चा केली, संवाद साधला. यात गावपातळीवर असलेल्या पॅनलचीही त्याला तितकीच मदत झाली. हळूहळू वॉर्ड आणि गावात महेशच्या बाजूने सकारात्मक मत बनण्यास सुरूवात झाली. परंतू, प्रतिशह हा राजकारणाचाच भाग असल्याने विरोधाला विरोध याच उक्तीप्रमाणे त्याच्यासमोर दुप्पट वयाचा आणि अनुभवी गावकरी विरोधी उमेदवार म्हणून उभा ठाकला.

सुशिक्षित उमेदवार असलेल्या महेशने या गोष्टीलाही एक आव्हान म्हणून स्विकारले आणि स्वतःचा प्रचार सुरूच ठेवला. हळूहळू जनमतही महेशला अनुकूल झाले. आणि प्रत्यक्ष मतदानात त्याचे प्रतिबिंब देखील उमटले. वर्षानूवर्षे राजकारणापासून दूर असलेल्या एका गरीब कुटूंबातील या तरूण उमेदवाराला लोकांनी त्याच्या योग्य विचार आणि ध्येयाला समजून घेत महेशच्या पारड्यात भरभरून मतदान दिलं.

साडेतीनहजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या आणी ११ सदस्यसंख्या असलेल्या पिसर्वे ग्रामपंचायतीत, जनआशीर्वादाने महेश वाघमारे हा युवा क्रीडा पत्रकार नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आला आहे. तब्बल २५० हून अधिकचे लीड (मते) घेत आणि समोरच्या दुप्पट वयाच्या उमेदवाराला महेशने धोबीपछाड दिलाय. खरे तर पत्रकार हा राजकीय प्रक्रियेचा अभ्यास ठेवणारा गट, पंरतू महेशने प्रत्यक्ष राजकारणात उडी घेत परिवर्तनाची नवी आरोळी ठोकली आहे.

एक क्रीडा पत्रकार, एक पदवीधर उमेदवार म्हणून कोणी सदस्य ग्रामपंचायतीत स्वयंप्रेरणेने काम करणार असेल, तर अशावेळी विकासाची अपेक्षा बाळगणे नक्कीच योग्य आहे. पिसर्वे सारख्या गावाचा विकास महेश वाघमारे सारख्या युवा नेतृत्वाने करावा, यासाठी त्यालाही शुभेच्छा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---