Pro Kabaddi League 2023: अहमदाबाद येथे प्रो कबड्डी लीग 2023 स्पर्धेतील पाचवा सामना पुणेरी पलटण विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स संघात सोमवारी (दि. 4 डिसेंबर) खेळला गेला. या सामन्यात पुणेरी पलटण संघाने गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघाचा 37-33 अशा अंतराने पराभव केला. या सामन्यात स्टार रेडर अर्जुन देशवाल याने जयपूरसाठी 17 गुण, तर पहिल्यांदाच नेतृत्व करत असलेल्या अस्लम इनामदार याने पलटणसाठी 10 गुण मिळवत चमकदार कामगिरी केली.
पीकेएल 10 (PKL 10) स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात पुणेरी पलटण (Puneri Paltan) संघाने सुरुवातीपासूनच चांगला खेळ दाखवला. एकेवेळी त्यांनी 6-3ने आघाडी घेतली होती. सहाव्या मिनिटाला इराणी अष्टपैलू मोहम्मदरेजा शादलू (Mohammadreza Shadloui) याने अजित कुमारला जाळ्यात अडकवले, पण जयपूर पिंक पँथर्स (Jaipur Pink Panthers) संघाने लवकरच आपल्या रेडर्सच्या जोरावर सामन्यात पुनरागमन केले. अर्जुन पलटणच्या डिफेन्ससाठी सातत्याने धोका बनत होता, पण अजितने 14व्या मिनिटाला केलेल्या शानदार रेडमध्ये अबिनेश नादराजन आणि मोहित गोयटला बाद करत पलटणला ऑलआऊट केले.
पँथर्सकडे 14-10ची चांगली आघाडी होती. तसेच, संघाने या सामन्यात आघाडी घेण्याची ही पहिलीच वेळ होती. अर्जुनने आपल्या पुढील तीन रेडमधील प्रत्येक रेडमध्ये गुण मिळवले. यासोबतच त्याने पँथर्सकडे हाफ टाईमपर्यंत चार गुणांची आघाडी कायम राहील याची खात्री केली.
हाफ टाईमनंतर अर्जुनने तिथूनच खेळ सुरू केला, जिथून सोडला होता. त्याने दुसऱ्या हाफच्या पहिल्या रेडमध्ये दोन गुण घेत आपल्या पीकेएल कारकीर्दीतील 36वे सुपर-10 मिळवले. जेव्हा असे वाटले की, पँथर्स आघाडी घेत आहे, तेव्हा पलटणने पुनरागमन करण्यासाठी कडवी झुंज दिली. अस्लमने दोघांना बाद करत दोन गुण मिळवले आणि त्यानंतर शादलूने डबल थाय होल्डसह अर्जुनला टॅकल केले आणि जयपूरला ऑल आऊट केले.
पुढे 25 मिनिटाच्या खेळानंतर पलटणने गुणांचे अंतर कमी करत स्कोर 21-23वर आणला. आता ते 2 गुण मागे होते. यानंतर कर्णधार अस्लमच्या काही यशस्वी रेड आणि अजितवर संकेत सावंतच्या एक मोठ्या टॅकलने संघाला 30व्या मिनिटाला 25-25च्या बरोबरीवर आणले.
यानंतर पुणेरी पलटण संघाच्या खेळाडूंनी सातत्याने गुण मिळवले. शादलूने एक गुण टॅकलमध्ये घेतला आणि त्यानंतर एक गुण रेडने मिळवला. तसेच, पँथर्सला ऑल आऊट होण्यास प्रवृत्त केले. इथून पलटणने 6 गुण मिळवत मोठी आघाडी घेतली, तर वेळ संपण्यासाठी 5 मिनिटे बाकी होती.
अर्जुनने आपल्या संघाला पुनरागमन करून देण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण तो काहीच करू शकला नाही. कारण, अस्लमने आपला सुपर-10 मिळवला आणि आपल्या नेतृत्वाखाली पुणेरी पलटणला शानदार विजय मिळवून दिला. (puneri paltan defeat jaipur pink panthers in pro kabaddi league 2023 5th match aslam Inamdar)
हेही वाचा-
PKL 2023: नवीनचा सुपर 10 व्यर्थ, Dabang Delhiचा दारुण पराभव; Thalaivasच्या उपकर्णधाराने मिळवले 21 पॉईंट्स
Pro Kabaddi League 2023: बेंगळुरू बुल्सचा धुव्वा उडवत गुजरात जायंट्सने मिळवला सलग दुसरा विजय