आयपीएल २०२२ पूर्वी बीसीसीआयने दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सामील होणार असल्याची माहिती दिली आहे. दोन नवीन फ्रेंचायझींच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षीचा आयपीएल हंगाम सुरू होण्याआधी मेगा लिवाल आयोजित केला जाणार आहे आणि यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लागताना दिसेल. दिल्ली कॅपिटल्स संघाने दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) याला पुढच्या हंगामापूर्वी रिलीज केले आहे आणि तो देखील मेगा लिलावासाठी उपस्थित असणार आहे. अशात अश्विनने त्याचा जुना आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्स (Channai Super Kings) साठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
रविचंद्रन अश्विन अनेक वर्षा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याने चेन्नई संघाला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यासाठी देखील महत्वाचे योगदान दिले आहे. परंतु २०१८ साली झालेल्या मेगा लिलावाच्या आधी चेन्नईने त्याला रिलीज केले होते. चेन्नईची साथ सुटल्यानंतर तो पंजाब किंग्स संघाचा सदस्य झाला आणि या संघाचे नेतृत्वदेखील केले होते. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स संघात सहभागी झाला आणि या संघासाठीही महत्वपूर्ण कामगिरी केली. आता त्याने चेन्नई संघामध्ये पुन्हा सामील होण्याविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई संघ त्याच्यासाठी शाळेसारखा असल्याचे अश्विनने सांगितले आहे.
अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, “चेन्नई सुपर किंग्स एक अशी फ्रेंचायझी आहे, जी माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. सीएसके माझ्यासाठी एका शाळेप्रमाणे आहे. याच ठिकाणी मी प्री केजी, एलकेजी, यूकेजी, प्राइमरी स्कूल, मिडल स्कूल आणि हाय स्कूल पूर्ण केले आहे. त्यानंतर मी वेगळ्या शाळेत गेलो, ज्याठिकाणी मी ११ वी आणि १२ वी पास केली. आता सगळे कोर्स संपले आहेत आणि प्रत्येकजण घरी परतू इच्छितो. मला संघात पुनरागमन करायला आवडेल, पण हे लिलावावर अवलंबून असेल.”
दरम्यान, बीसीसीआयने आयपीएलच्या पुढच्या हंगामापूर्वी सर्व फ्रेंचायझींसाठी नियम केला होता की, त्यांना संघातील चार खेळाडूंव्यतिरिक्त इतर सर्व खेळाडूंना रिलीज करावे लागेल. अशात सर्व फ्रेंचायझींना पुढच्या हंगामासाठी चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे आणि इतर सर्व खेळाडू मेगा लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. अश्विनप्रमाणे इतरही अनेक दिग्गज मेगा लिलावात उपलब्ध असतील. अशात अश्विन पुढच्या वर्षी कोणत्या संघासाठी खेळतो हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
रुटचा २०२१ वर्षात डंका! विव रिचर्ड्स, ग्रॅमी स्मिथ सारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
विराट विरुद्ध गांगुली वादाचे पडसाद सोशल मीडियावरही, #WorldStandsWithKohli हॅशटॅग ट्रेंड
तब्बल ५०५ मिनिटे फलंदाजी अन् ९९ धावांवर बाद, वाचा गावसकरांच्या ‘हिरो’च्या खेळीबद्दल सविस्तर