भारताचा युवा बुद्धीबळपटू रमेश बाबू प्रज्ञानंदा यानं डब्लू आर चेस मास्टर 2024 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं 5 वेळचे वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंद यांचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. प्रज्ञानंदानं गेल्या काही स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली आहे.
डब्लू आर चेस मास्टर 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदानं विश्वनाथन आनंद यांचा 2-1 असा पराभव केला. दोघांमधील पहिले दोन खेळ अनिर्णित राहिले. त्यानंतर 19 वर्षीय प्रज्ञानं टायब्रेकमध्ये विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना भारताच्याच अर्जुन एरिगॅसी सोबत होईल. अर्जुननं उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या विदित गुजराथीचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे.
उपांत्यपूर्व फेरीपूर्वी प्रज्ञानंदानं मोल्डोव्हाच्या विक्टर बोलोगन यांचा पहिल्या फेरीत पराभव केला होता. या सामन्यात त्यानं 2-0 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना फ्रान्सचा मॅक्सिम वॅचिअर-लाग्रेव आणि अलिरेज फिरोजा यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीत विजय मिळवणारे दोन खेळाडू विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येतील.
आर प्रज्ञानंदा 2016 मध्ये वयाच्या 10 वर्षे, 10 महिने आणि 19 दिवसांत इतिहासातील सर्वात तरुण बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मास्टर बनला होता. त्यानंतर 2018 मध्ये बुद्धिबळ ग्रॅन्डमास्टर बनला. ही कामगिरी करणारा तो भारताचा सर्वात तरुण आणि जगातील चौथा सर्वात तरुण व्यक्ती ठरला.
प्रज्ञानंदा याचा जन्म 10 ऑगस्ट 2005 रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. त्याचे वडील रमेशबाबू बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. तर त्याची आई नागलक्ष्मी एक गृहिणी आहे. ती प्रज्ञानंदा याच्याबरोबर स्पर्धांसाठी प्रवास करते. प्रज्ञानंदाची मोठी बहीण वैशाली ही देखील बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. बुद्धिबळ व्यतिरिक्त, प्रज्ञानंदाला फावल्या वेळेत टेबल टेनिस खेळणं आणि क्रिकेट पाहणं आवडतं.
हेही वाचा –
आपल्याच खेळाडूच्या कानशीलात लगावली, या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचं तत्काळ निलंबन!
कसोटीनंतर, वनडे आणि टी20 मालिकेची घोषणा, पाहा संपूर्ण वेळापत्रक!
SL vs WI: श्रीलंकेचा पलटवार, वेस्ट इंडिजचा दारुण पराभव, मालिकेत बरोबरी