भारतीय क्रिकेट संघाला येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक २०२२ खेळायचा आहे. या विश्वचषकासाठी मजबूत संघबांधणी करण्यावर भारताचे संघ व्यवस्थापन केंद्रित करत आहे. त्याच दृष्टीने भारतीय संघात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. टी२० विश्वचषक २०२१ नंतर भारतीय संघाने एकूण ११ वेगवान गोलंदाजांना आजमावले आहे. यापैकी केवळ ३ वेगवान गोलंदाजांना टी२० विश्वचषकासाठी अंतिम संघात निवडले जाईल. ते ३ गोलंदाज कोण आहेत?, याबद्दल माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी भविष्यवाणी केली आहे.
गतवर्षी झालेल्या टी२० विश्वचषकानंतर (T20 World Cup 2022) भारतीय संघाने (Team India) ११ वेगवेगळ्या वेगवान गोलंदाजांना संधी देऊन पाहिल्या आहेत. यापैकी हर्षल पटेल, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांनी त्यांच्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले आहे. या तिघांनीही आयपीएलमधील आपल्या दमदार प्रदर्शनाने भारतीय संघाच्या निवडकर्त्यांना प्रभावित केले होते आणि भारतीय संघात जागा मिळवली होती. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना त्यांनी स्वत:ला सिद्धही केले आहे.
या नवख्या गोलंदाजांबरोबरच वरिष्ठ असलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हेदेखील चांगल्या लयीत दिसत आहेत. तर मोहम्मद शमीला (Mohammad Shami) मात्र टी२० विश्वचषकानंतर जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता टी२० विश्वचषकासाठी कोणत्या ३ वेगवान गोलंदाजांना निवडले जाईल, याबद्दल श्रीधर (R Shridhar) बोलले आहेत.
क्रिकेट डॉट कॉमवर बोलताना श्रीधर म्हणाले की, “मला वाटते की, टी२० विश्वचषकासाठी भारताकडून पसंती मिळणाऱ्या पहिल्या ३ वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांचा समावेश असेल. हे ३ गोलंदाज तुमच्या ताफ्यात असतील, तर तुम्ही सर्वात मजबूत असाल. या तिघांना निवडल्यात तुमच्याकडे नव्या चेंडूने पावरप्लेमध्ये कहर माजवणारा आणि डेथ ओव्हर्सचा स्पेशलिस्ट गोलंदाज असतील. फिटनेसबाबतीत बोलायचे झाल्यास भुवनेश्वर सध्या त्याच्या सर्वोत्तम फिटनेसमध्ये आहे.”
पुढे बोलताना श्रीधर म्हणाले की, “तुमच्याकडे शमीसारखा गोलंदाज उपलब्ध आहे, जो नव्या चेंडूसह विरोधी संघाच्या फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडतो. तर तुमच्याकडे भुवनेश्वर, शमी यांच्याव्यतिरिक्त रविंद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांच्या रूपात पाचवा आणि सहावा गोलंदाजही असेल. टी२० विश्वचषकासाठी अशाच खेळाडूंची गरज असते.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-