भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेत ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आणि भारतीय संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. या सामन्यात न्यूझीलंड संघाकडून भारतीय वंशाचा रचीन रवींद्र मैदानात उतरला होता. अनेकांना ऐकून आश्चर्य वाटेल की, त्याचे नाव २ दिग्गज भारतीय खेळाडूंच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
रचीन हे नाव ऐकायला थोड वेगळं वाटतं बरोबर ना? या नावामागे ही वेगळं कारण आहे. रचीनचे वडील, रवी कृष्णमूर्ती यांनी त्याचे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावरून ठेवले आहे. त्यांनी राहुल द्रविडच्या नावातील ‘र’ आणि सचिन तेंडुलकरच्या नावातील ‘चिन’ हे शब्द एकत्र करून रचीन नाव ठेवले आहे.
रचीन रवींद्र यापूर्वी देखील भारतीय दौऱ्यावर आला आहे. परंतु त्यावेळी तो १९ वर्षाखालील संघासोबत होता. त्यावेळी रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुदंर भारतीय संघासाठी १९ वर्षाखालील संघात खेळायचे. आता पुन्हा एकदा तो भारतात आला आहे. तब्बल ५ वर्षानंतर तो न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघासोबत भारतात आला आहे. पहिल्या टी२० सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. परंतु, तो ८ चेंडूंमध्ये अवघ्या ७ धावा करत बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने त्रिफळाचित करत माघारी पाठवले.
तसेच, या सामन्याबाबत बोलायचं झालं तर, भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गप्टीलने सर्वाधिक ७०, तर मार्क चॅपमनने ६३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ६ बाद १६४ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली, तर रोहित शर्माने ४८ धावांचे योगदान देत भारतीय संघाला हा सामना ५ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताची एक नंबर जोडी! रोहित-राहुलने ५० धावांच्या भागीदारीसह ‘या’ विक्रमात मिळवला पहिला क्रमांक
तब्बल ८८ खेळाडू घेणार जोखीम! दिल्लीत विषारी हवेत खेळणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची उपांत्यपूर्व फेरी
पहिल्याच षटकात फलंदाजाला गोल्डन डकवर बाद करायचंय? मग भुवी आहे ना!