टेनिसविश्वातील मानाच्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धापैकी पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचा समारोप रविवारी (२९ जानेवारी) मेलबर्न येथे झाला. रॉड लेवर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात राफेल नदाल याने २-६, ६-७(५-७), ६-४, ६-४, ७-५ असा विजय मिळवत २१ वे ग्रँडस्लॅम आपल्या नावे केले. यासह तो टेनिस इतिहासात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे.
पहिले दोन सेट मेदवेदेवच्या नावे
सर्व प्रेक्षकांना हा सामना उत्कंठावर्धक होईल अशी अपेक्षा होती. युवा मेदवेदेव पहिल्या दोन सेटमध्ये अत्यंत आक्रमक खेळ केला. पहिल्या सेटमध्ये त्याने अनुभवी नदालला अक्षरशा नामोहरम करत ६-२ असा सेट आपल्या नावे केला. दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत ताणला गेला ज्यामध्ये पुन्हा एकदा मेदवेदेव ७-६ असा सरस ठरला. त्यामुळे, ऑस्ट्रेलियन ओपनला नवा राजा मिळणार, अशी चर्चा सुरू झाली.
नदालचे शानदार पुनरागमन
पहिल्या दोन सेटमध्ये हरल्यानंतर अनुभवी नदालने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने मेदवेदेव याला प्रतिकाराची जास्त संधी न देता पुढील दोन्ही सेट प्रत्येकी ६-४, ६-४ असे आपल्या नावावर केले. अखेरच्या निर्णायक सेटमध्ये पहिला गेम जिंकत मेदवेदेव याने आघाडी घेतली. त्यानंतर, नदालने एक गेम जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर सामना पुन्हा एकदा अटीतटीचा बनला. दोन्ही खेळाडू एका एका गुणांसाठी झुंज देताना दिसले. नदालने अखेरचा सेटमधील सहावा गेम जिंकत ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र पुढील तीन मिनिटात जिंकत मेदवेदेवने ४-३ असा सेट रंगतदार बनविला. त्यानंतर नदालने पुन्हा एकदा गेम जिंकत विजेतेपदाकडे आगेकूच केली. मात्र, मेदवेदेव हार मानण्यास तयार नव्हता. त्याने पुढील दोन गेम जिंकत सामना आणखी चुरशीचा केला. नदालने पुढील सेट आपल्या नावे करताना सर्विस स्वतःकडे राखली. चॅम्पियनशिपसाठी असलेल्या या गेममध्ये नदालने मेदवेदेव याला अजिबात संधी न देता आपले विश्वविक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम जिंकले.
इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू बनला नदाल
चालू वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमसह नदाल टेनिस विश्वात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू बनला. त्याने रॉजर फेडरर नोवाक जोकोविक यांना मागे टाकत २१ ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विश्वविक्रम केला. फेडरर व जोकोविच यांच्या नावावर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम आहेत.