भारतीय संघाचे पुढील आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बरेच व्यस्त आहे. जून ते सप्टेंबर या कालावधील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. याच काळात जुलै महिन्यामध्ये भारतीय संघाला श्रीलंका दौराही करायचा आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसआय) दोन वेगवेगळ्या तुकड्यांना या दौऱ्यांवर पाठवण्याचे नियोजन बनवले आहे. इंग्लंड दौऱ्यावर अनुभवी क्रिकेटपटूंचा भरणा असलेला अ संघ तर श्रीलंका दौऱ्यावर युवा शिलेदारांच्या ब संघाला पाठवण्याची योजना आहे.
अशात या नव्या ब संघासोबत नवा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड याची नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष असलेल्या द्रविडला आता नव्हे तर ३ वर्षांपुर्वीच भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्याची संधी चालून आली होती. याबाबत भारतीय संघाच्या प्रशासक समितीचे माजी अध्यक्ष विनोद राय यांनी उलगडा केला आहे.
राहुल द्रविडने आम्हाला सहकार्य केले नाही
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ नंतर अनिल कुंबळेने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरुन राजीनामा दिला होता. त्यावेळी विनोद राय यांनी द्रविडला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची विनंती केली होती. परंतु त्याने काही कारणास्तव नकार दिला होता.
याबाबत स्पोर्ट्सकिडाशी बोलताना विनोद राय म्हणाले की, “राहुल द्रविडने त्यावेळी (२०१७ साली) आम्हाला सहकार्य केले नव्हते. आम्ही त्याला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवू इच्छित होतो. परंतु त्याने प्रशिक्षकपदाची ऑफर फेटाळली होती.”
द्रविडला आम्हाला म्हणाला होता की, “माझी २ मुले मोठी होत आहेत. अशावेळी मी भारतीय संघासोबत पूर्ण जगाचा दौरा करत आहे. मी एक वडील म्हणून त्यांना वेळ देऊ शकत नाहीये. त्यांच्यावर लक्ष ठेवू शकत नाहीये. मला वाटते की हा वेळ मी माझ्या कुटुबीयांना द्यायला पाहिजे. त्याच्या या विनंतीला आम्हाला मान्य करावे लागले. मला वाटते की ही त्यांची एक अतिशय वाजवी विनंती होती,” असे त्यांनी पुढे सांगितले.
भारतीय ब संघासाठी द्रविड असेल योग्य प्रशिक्षक
राहुल द्रविड हा १९ वर्षांखालील आणि भारतीय अ संघाचा मार्गदर्शक राहिला आहे. तसेच पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांसारखे खेळाडू राहुल द्रविडच्या देखरेखीखालीच घडले आहेत. शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांसारखे खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतात. यातील बऱ्याचशा खेळाडूंना राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभल्याने त्यांच्यासाठी हा निर्णय सोईचा ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“तो रिषभ पंतच आहे, ज्याने भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पोहोवलंय”
हार्दिक पंड्या विरुद्ध ड्रोनाचार्य; मुंबई इंडियन्सच्या सराव सत्राचा फेरपटका, पाहा न पाहिलेले प्रसंग
कसोटी चॅम्पियनशीप: भारतीय मूळ असलेला न्यूझीलंडचा पठ्ठ्या टीम इंडियासाठी ठरणार डोकेदुखी, केलीत ४ शतके