भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या काही दिवसातच रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने सामने असणार आहेत. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांपासून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच न्यूझीलंड संघाला देखील या सामन्यापुर्वी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत सराव करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार यात काही शंकाच नाही.
या मोठ्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघात भारतीय वंशाच्या युवा खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. तो खेळाडू म्हणजे, रचिन रविंद्र.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी २१ वर्षीय भारतीय वंशाचा खेळाडू रचिन रविंद्र याला संधी दिली आहे. रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती आणि आई दीपा कृष्णमूर्ती हे वेलिंग्टनचे स्थानिक निवासी आहेत. रचिनचा जन्म देखील वेलिंग्टनमध्येच झाला होता. वयाच्या ५ व्या वर्षी त्याने प्लास्टिक चेंडूने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
रचिन हे नाव ऐकायला थोडे वेगळे वाटते बरोबर ना? या नावामागेही वेगळे कारण आहे. रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती यांनी त्याचे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावरून ठेवले आहे. त्यांनी राहुल द्रविडच्या नावातील ‘र’ आणि सचिन तेंडुलकरच्या नावातील ‘चिन’ हे शब्द एकत्र करून ‘रचिन’ नाव ठेवले आहे.
रचिनच्या वडिलांबद्दल बोलायचं झालं तर, त्याचे पिता रवी कृष्णमूर्ती हे माजी भारतीय गोलंदाज आणि सामना अधिकारी जवागल श्रीनाथ यांचे खूप चांगले मित्र आहेत. दोघांनीही बेंगलोरमध्ये एकत्र क्रिकेट खेळले आहे. रचिनचे वडील त्याच्या कामगिरीबद्दल नेहमीच जवागल श्रीनाथसोबत चर्चा करत असतात.
रचिनची भारताविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघात निवड झाली आहे. जर त्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली तर तो या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल. देशांतर्गत स्तरावर रचिनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या २१ वर्षीय अष्टपैलूच्या नावे प्रणथ श्रेणीमध्ये ३ आणि अ दर्जाच्या सामन्यात एका शतकाची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्या विरुद्ध ड्रोनाचार्य; मुंबई इंडियन्सच्या सराव सत्राचा फेरपटका, पाहा न पाहिलेले प्रसंग
भारतासाठी खुशखबर; २.९९च्या इकोनॉमीने विकेट्स घेणारा ‘हा’ इंग्लिश गोलंदाज कसोटी मालिकेला मुकणार!
मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू बनलाय मच्छीमार, पकडलेत ३ मोठे मासे; बघा खास फोटो