---Advertisement---

राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ महत्त्वाचा सल्ला, मोहम्मद सिराजने केला खुलासा

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 12:13 AM
---Advertisement---

अहमदाबाद। गुरुवारपासून (४ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या प्रदर्शनाने या सामन्याचा पहिला दिवस गाजवला. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर मोहम्मद सिराजने पत्रकार परिषदेत पहिल्या दिवसाच्या खेळावर तसेच त्याच्या कामगिरीबद्दल भाष्य केले आहे.

या सामन्यात भारताने इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या दोनच वेगवान गोलंदाजांना अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे. त्यामुळे गोलंदाजी करण्याआधी कर्णधार विराट कोहलीने काय सल्ला दिला होता असे विचारले असता, सिराज म्हणाला, ‘विराट भाईने आम्हाला सांगितले हो की गोलंदाज बदलत राहू, तुम्हाला पूर्ण आराम मिळेल. तसेच त्याने इतकेच सांगितले होते की चेंडू एकाच जागेवर टाकत राहा, जेणेकरुन दबाव वाढत राहिल. मी इशांतशीही बोललो. तोपण मला हेच म्हटला की एकाच जागेवर चेंडू टाकू आणि दबाव आणू. फलंदाज दबावात आले की विकेट्स मिळतील, आमची हिच योजना होती.’

द्रविडने दिला होता ‘हा’ सल्ला 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी सिराज भारत अ संघाकडूनही खेळला आहे. त्यावेळी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारत अ संघाचा प्रशिक्षक होता. त्यामुळे सिराजला द्रविडच्या मार्गर्दशनाबद्दल विचारण्यात आले.

त्यावर सिराज म्हणाला, ‘मला राहुल सरांनी रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करताना पाहिले होते. त्यांनी मला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघात निवडले. त्यांनी मला सांगितले होते की मी चेंडूला चांगली दिशा आणि टप्पा देतो. तसेच त्यांनी मला सांगितले होते की मी माझ्या फिटनेसवर आणि माझ्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. जेव्हा मी भारत अ संघासाठी खेळलो, राहुल सरांनी मला पाठिंबा दिला.’

तसेच सिराज पुढे म्हणाला, ‘ते मला फार काही सांगायचे नाहीत. त्यांनी मला फक्त माझ्या चेंडूच्या दिशेवर आणि टप्प्यावरच लक्ष द्यायला सांगितले होते.’

असे केले रुटला बाद 

सिराजने या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रुटला केवळ ५ धावांवर बाद करत मोठा धक्का दिला होता. त्याच्या विकेटसाठी काय योजना होत्या, याबद्दल सांगताना सिराज म्हणाला, ‘मी केवळ एवढाच विचार केला होता की चेंडू बाहेर जाईल असा टाकत राहिल आणि रुटला थोडं स्थिर होऊ देईल आणि मग एक चेंडू आत जाणारा टाकेल. मी गोलंदाजी करत असताना माझ्या योजनेप्रमाणेच झाले. माझे चेंडू बाहेर जात होते आणि मग मी एक चेंडू आत टाकला आणि तो बाद झाला.’

स्टोक्सने वापरले अपशब्द 

या सामन्याच्या पहिल्याच दिवशी बेन स्टोक्स, सिराज आणि विराट यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसले होते. याबद्दल विचारले असताना सिराज म्हणाला, ‘बेन स्टोक्सने मला शिवी दिली. मी त्याबद्दल विराट भाईला सांगितले. त्यानंतर विराटनेच पुढच्या गोष्टी सांभाळल्या. पण या गोष्टी मैदानात होतच राहातात, त्यात काही मोठी गोष्ट नाही.’

सिराजची चांगली कामगिरी 

या सामन्यात सिराजला जसप्रीत बुमराहऐवजी अंतिम ११ जणांच्या भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्यानेही या संधीचा पूर्ण वापर करताना पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या. त्याने जॉनी बेअरस्टो (२८) आणि जो रुट (५) या दोन प्रमुख फलंदाजांना बाद केले.

पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व 

या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १२ षटकात १ बाद २४ धावा केल्या आहे. पहिल्या दिवसाखेर रोहित शर्मा ८ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा १५ धावांवर नाबाद आहेत.

त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्या डावात ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या आहेत. इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. तसेच डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही.

भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स, मोहम्मद सिराजने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

‘पाच’ आकड्याची जादू! चौथ्या कसोटीत झालेला ‘हा’ योगायोग पाहून व्हाल चकीत

Video : खराब फॉर्ममध्ये असलेल्या ‘या’ खेळाडूचे नशीबही देईना साथ, झाला अशा पद्धतीने बाद

रोहितला हे काय झालं? झेल घेत रहाणेकडे केलं अपील, व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---