कोरोना महामारीमुळे लांबलेल्या भारतातील देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेने होते आहे. बीसीसीआयने जानेवारी महिन्यात या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अनेक महिन्यांनी पुन्हा एकदा देशांतर्गत स्पर्धा सुरु होत असल्याकारणाने सगळ्याच संघांनी या स्पर्धेसाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र संघदेखील या स्पर्धेत विजेतेपदाच्या इर्षेने उतरत असून आक्रमक भारतीय फलंदाज राहुल त्रिपाठीच्या हातात संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली आहेत.
केदारसह ऋतुराजचा संघात समावेश
नववर्षातील १० जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या टी२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघाने बुधवारी (३० डिसेंबर) २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्रिपाठीव्यतिरिक्त भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला या संघात स्थान देण्यात आले आहे. तर आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून प्रभावी प्रदर्शन केलेल्या ऋतुराज गायकवाडचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघाला एलिट गट सी मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, बडोदा, आणि उत्तराखंड या क्रिकेट संघांचाही समावेश आहे. या गटातील सर्व सामने वडोदरा येथे खेळवण्यात येणार आहेत.
अहमदाबाद येथे होणार अंतिम सामना
मुश्ताक अली स्पर्धेसाठी संघांची सहा गटात विभागणी करण्यात आली आहे. यात ५ एलिट गट तर एका प्लेट गटाचा समावेश आहे. स्पर्धेचे साखळी सामने १९ जानेवारीपर्यंत खेळले जातील, तर बाद फेरीच्या सामन्यांना २० जानेवारी पासून सुरुवात होईल. एलिट गटाचे साखळी सामने मुंबई, चेन्नई, कोलकाता, इंदौर, चेन्नई आणि वडोदरा येथे होणार असून प्लेट गटाचे सामने मात्र फक्त चेन्नईतच खेळविले जातील. या स्पर्धेचे उपांत्य सामने २९ जानेवारी रोजी खेळविले जाणार असून अंतिम सामना ३१ जानेवारी अहमदाबाद येथे होईल.
असा आहे २० सदस्यीय महाराष्ट्र संघ –
राहुल त्रिपाठी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख, केदार जाधव, रणजीत निकम, अजीम काझी, निखिल नाईक, विशांत मोरे, सत्यजीत बचाव, तरणजीत सिंग ढिल्लो, एस काझी, प्रदीप डाधे, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, दिव्यांग हिनगांकर, राजवर्धन हंगारगेकर, जगदीस जोप, स्वप्निल गुगाले, धनराज परदेसी आणि सन्नी पंडीत
संबधित बातम्या-
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत श्रीसंतचा सहभाग निश्चित, खास कॅप्शन देत शेअर केला व्हिडिओ
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर; अर्जुनला डच्चू, तर ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद