जगातील सर्वात प्रसिद्ध टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उर्वरित भागाला सुरूवात होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सर्व संघांनी या हंगामासाठी उपलब्ध राहू न शकणाऱ्या खेळाडूंच्या जागी इतर खेळाडू करारबद्ध करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी (२५ ऑगस्ट) राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ताफ्यात आणखी एका खेळाडूला सामील करून घेतले.
या खेळाडूंनी घेतली माघार
मागील दोन वर्षापासून राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ऍण्ड्रू टाय याने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यावेळी अचानकपणे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता युएई येथे होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातही तो उपलब्ध असणार नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी राजस्थान संघ व्यवस्थापनाने दुसऱ्या खेळाडूचा शोध सुरू केला होता.
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केला संघात सामील
ऍण्ड्रू टाय उर्वरित आयपीएलसाठी उपलब्ध नसल्याने राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापनाने दक्षिण आफ्रिकेचा चायनामन फिरकीपटू तबरेज शम्सी याला करारबद्ध केले. शम्सी सध्या आंतरराष्ट्रीय टी२० गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. शम्सी यापूर्वी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. शम्सी बळी मिळविल्यानंतर जल्लोष करताना वेगवेगळ्या जादू करून दाखवत असतो. त्याच्या नावे ३९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ४५ बळी जमा आहेत.
राजस्थानसाठी वाट अवघड
राजस्थान रॉयल्स संघासाठी आयपीएलचा उर्वरित हंगाम कठीण जाणार असल्याचे दिसत आहे. संघाचे प्रमुख विदेशी खेळाडू अष्टपैलू बेन स्टोक्स, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व सलामीवीर जोस बटलर हे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. जोस बटलरच्या जागी संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक ग्लेन फिलीप्स याला पाचारण केले आहे. सध्या संघाकडे ख्रिस मॉरिस, मुस्तफिझुर रहमान, लियाम लिव्हींगस्टोन व डेव्हिड मिलर हे विदेशी खेळाडू उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अजबच! धोनीने मारले लांबच लांब शॉट्स आणि मग स्वत:च संघसहकाऱ्यांसह गेला झुडपात चेंडू शोधायला
कोरोना महामारीत खेळाडूंच्या कमाईत कपात, मात्र अधिकाऱ्यांना बोनस; ईसीबीच्या निर्णयाने खळबळ
दहा वर्षात अँडरसनचा टीम इंडियावर चौथा वार! वाचा ही खास आकडेवारी