---Advertisement---

आयपीएल पूर्वी राजस्थान रॉयल्सची विक्री; जाणून घ्या 15 हजार कोटींना नक्की कोणी खरेदी केली टीम?

On: मंगळवार, मार्च 24, 2026 5:55 PM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल २००८ च्या पहिल्या हंगामाचा विजेता राहिला होता. त्यानंतर मात्र संघाची कामगिरी फारशी समाधानकारक राहिली नव्हती. तरीही, काही तरुण खेळाडूंमुळे ही फ्रँचायझी नेहमीच चर्चेत असते. सध्या हा संघ रियान परागच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२६ ची तयारी करत आहे. दरम्यान, लीग सुरू होण्याला अवघे ३ दिवस शिल्लक असताना राजस्थान रॉयल्स संघाची विक्री झाली आहे. अमेरिकेतील एका उद्योजकाने हा संघ १५ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेत खरेदी केला आहे.

​मनोज बदाले यांनी राजस्थान रॉयल्समधील त्यांचे सर्व शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता फ्रँचायझीचे १०० टक्के शेअर्स अमेरिकेतील उद्योजक आणि ‘कंसोर्टियम’ कंपनीचे मालक काल सोमानी यांनी १५ हजार कोटी ते १५ हजार ३०० कोटी रुपयांच्या दरम्यान आपल्या नावावर केले आहेत. तरीही, आयपीएल २०२६ मध्ये हा संघ मनोज बदाले यांच्या नावेच राहील. या करारानुसार, काल सोमानी यांच्याकडे संघाची मालकी आयपीएल २०२७ पासून येईल. आंतरराष्ट्रीय बँक ‘रेइन ग्रुप’च्या (Raine Group) देखरेखीखाली हा व्यवहार निश्चित झाला आहे. राजस्थान रॉयल्सला खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्या शर्यतीत होत्या, मात्र अखेर काल सोमानी यांनी हा सौदा आपल्या नावे केला.

​आयपीएलचा पहिला चॅम्पियन असलेल्या राजस्थान रॉयल्सची किंमत १.६३ बिलियन डॉलर इतकी लावली गेली आहे. या व्यवहारानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची (RCB) किंमतही वाढली आहे. त्यांची किंमत आता २ बिलियन डॉलरच्या पुढे जाऊ शकते. सध्या युनायटेड स्पिरिट्स ही कंपनी आरसीबीला खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. आयपीएल २०२६ दरम्यान तो व्यवहारही निश्चित होऊ शकतो. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने अद्याप या व्यवहाराची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---