सध्या 2024 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. फायनलमध्ये मुंबई विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशनं 20 षटकात 8 विकेट गमावत 174 धावा केल्या. आता मुंबईला विजयासाठी 175 धावांचं लक्ष्य मिळालं आहे.
मध्य प्रदेशला ही धावसंख्या रचण्यात संघाचा कर्णधार रजत पाटीदारचा मोठा वाटा होता. त्यानं अंतिम सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावलं. या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून मध्य प्रदेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. मुंबईविरुद्ध मध्य प्रदेशची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. संघानं 54 धावांत 4 विकेट गमावल्या.
यानंतर कर्णधार रजत पाटीदारनं जबाबदारी सांभाळत मध्य प्रदेशला अतिशय सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेलं. एका बाजूने संघाच्या विकेट पडत राहिल्या तरी रजत नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानं 40 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीनं 81 धावांची नाबाद खेळी केली.
मध्य प्रदेशकडून रजत पाटीदार शिवाय शुभ्रांशू सेनापतीनं 23 धावा केल्या, तर हरप्रीत सिंग भाटियानं 15 धावा, व्यंकटेश अय्यरनं 17 धावा आणि राहुल बोथमनं 19 धावा केल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकूरनं 2 तर रेस्टन डायसनं 2 बळी घेतले. याशिवाय अथर्व अंकोलकर, शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे यांना प्रत्येकी एक यश मिळालं.
रजतनं या सामन्यात आपलं अर्धशतक अवघ्या 28 चेंडूत पूर्ण केलं. तो त्याच्या संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता. याआधी उपांत्य फेरीच्या सामन्यातही रजतनं 29 चेंडूत 66 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशनं उपांत्य फेरीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली होती.
हेही वाचा –
VIDEO : गाबाच्या मैदानावर कोहली-भज्जीचा भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच
धारावीच्या झोपडपट्टीतील मुलगी करोडपती बनली! WPL लिलावात मिळाली बेस प्राईज पेक्षा 19 पट रक्कम
महिला प्रीमियर लीगमध्ये पैशांचा वर्षाव, लिलावात 16 वर्षीय मुलगी बनली करोडपती!