काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला भारतीय संघासाठी प्रशिक्षक शोध मोहिम सुरु केली होती. अखेर या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची वर्णी लागली आहे. पोवार हे पुन्हा एकदा भारताच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले असल्याची घोषणा गुरुवारी (13 मे) करण्यात आली.
पोवार यांनी यापूर्वी जुलै ते नोव्हेंबर 2018 दरम्यान भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने 2018 सालच्या टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीत धडक मारली होती. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने सलग 14 टी20 सामनेही जिंकण्याची करामत केली होती. पण 2018 च्या महिला टी20 विश्वचषकानंतर मिताली राज आणि त्यांच्यातील वादामुळे अखेर ते प्रशिक्षकपदावरुन दूर झाले होते.
दुसऱ्यांदा पोवार प्रशिक्षकपदी
पोवार यांनी दुसऱ्यांदा प्रशिक्षकपद मिळवताना डब्ल्यूव्ही रमण, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममता माबेन, हेमलता कला आणि देविका वैद्य या उमेदवारांना मागे टाकले आहे.
पोवार यांच्यापूर्वी डब्ल्यूव्ही रमण हे भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक होते. पण त्यांचा करार यावर्षी संपला. त्यानंतर बीसीसीआयने या पदासाठी इच्छूक उमेदवारांना अर्ज पाठवण्याची जाहीरात केली होती. त्यानंतर एकूण 35 अर्ज बीसीसीआयकडे आले होते. त्यातील 8 जणांची अंतिम निवड करण्यात आली होती. या 8 जणांची मुलाखत मदन लाल, सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंग यांचा समावेश असणाऱ्या सल्लागार समितीने घेतल्या. त्यानंतर गुरुवारी पोवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पोवार यांची कारकिर्द
रमेश पोवार यांनी त्यांच्या कारकिर्दीत 2 कसोटी आणि 31 वनडे सामने खेळले आहेत, यात त्यांनी अनुक्रमे 6 आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यांनी 148 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 470 विकेट्स घेतल्या आहेत आणि 4245 धावा देखील केल्या आहेत. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्यांनी 113 सामने खेळले असून 142 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 1082 धावा केल्या आहेत. तर 28 टी20 क्रिकेट सामने खेळले असून 14 विकेट्स या क्रिकेट प्रकारात घेतल्या आहेत.
त्यांनी इसीबी आणि बीसीसीआयचा प्रशिक्षकाचा लेव्हल दोनचा कोर्सही पूर्ण केला आहे. तसेत त्यांनी नुकतेच यावर्षी विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले होते. तसेच ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहात होते.
इंग्लंड दौऱ्याचे असेल आव्हान
दुसऱ्यांदा प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या पोवार यांच्यासमोर पहिले आव्हान हे इंग्लंड दौऱ्याचे असणार आहे. भारतीय महिला संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय महिला संघाला १ कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यापूर्वी सहाय्यक कर्मचार्यांची निवड नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती करेल.
पोवार-मिताली वाद
भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज मिताली राजला 2018 सालच्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे अनेकांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.
या प्रकरणानंतर मितालीनेही बीसीसीआयला पत्र लिहून भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवारांवर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समिती (सीओए) सदस्य डायना एडलजी यांच्यावरही तिने यांच्यावरही भेदभाव केल्याचा आरोप केला होता.
पण तिच्या या आरोपांना उत्तर देताना हे सर्व आरोप पोवार यांनी नाकारले. तसेच तिला तिच्या कमी स्ट्राइक रेटमुळे संघात न घेण्याचे कारण पोवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र या वादामुळे पोवार यांचे प्रशिक्षकपद कायम करण्यात आले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताकडून झालेल्या पराभावानंतर टिम पेनची सारवासारव, भारतीय संघालाच केले बदनाम
संवेदनशील ऑस्ट्रेलियन! ब्रेट ली आणि कमिन्ससह आणखी ११ खेळाडूंनी कोरोनाविरोधी लढाईसाठी केली मदत
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपविषयी स्टुअर्ट ब्रॉडचे धक्कादायक वक्तव्य, म्हणाला…