भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . कोरोनाचा शिरकाव आयपीएल स्पर्धेत देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सुरू असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी ३८ लाखांची मदत केली होती. त्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटपटू देखील मदत करण्यासाठी पुढे आले होते. यात आता पॅट कमिन्ससह आणखी १२ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूनी मदतीचा हात पुढे केला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाच्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंनी, भारतातील कोरोनाच्या लढ्यात योगदान देण्याचे ठरवले आहे.त्यांनी आपल्या देशातील नागरिकांना युनिसेफ मध्ये निधी जमा करण्याची मागणी केली आहे. युनिसेफ ऑस्ट्रेलिया द्वारे ट्विटर वर व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. ज्यामध्ये एलन बॉर्डर सह अनेक खेळाडूंनी म्हटले की,” भारतातील परिस्थिती हृदय विदारक आहे आणि या कठीण काळात आपण सर्वजण एक व्हायला हवं.”
एलन बॉर्डर शिवाय, पॅट कमिन्स,ब्रेट ली, एलेक्स ब्लैकवेल, जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क, माईक हसी, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबुशेन, एलिस पेरी, एलिसा हेली, मेग लेनिंग आणि रेचल हेन्स यांचा देखील समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी निधी जमा करण्यासाठी भावनिक मागणी केली.त्यांनी म्हटले की, “भारतात दर सेकंदाला कोरोनाची चार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. तेथे पुरेसे ऑक्सिजन देखील उपलब्ध नाहीये. कोरोनाचा हा काळ अतिशय भयानक आहे.अशा कठीण काळात आपल्याला एकत्र राहावे लागेल. आम्ही युनिसेफच्या माध्यमातून आमचा पाठिंबा देत आहोत. त्यांची टीम अद्याप मैदानात असून गरजूंना आपत्कालीन वस्तू पोहचवण्याचे काम करत आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की,”कोणीही सर्व काही करु शकत नाही परंतु प्रत्येकजण थोडं तरी करू शकतो. या लिंकवर क्लिक करून आमच्यात सहभागी व्हा. कारण आत्ताच भारताला आपली गरज आहे. यूनिसेफ डॉट ओआरजी डॉट एयू वर जाऊन तुम्ही देणगी देऊ शकतात.”
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौरा या तीन खेळाडूंसाठी ठरू शकतो अखेरची संधी
ऑस्ट्रेलियन संस्कृतीतून ही गोष्ट शिकून द्रविडने भारतात खेळाडू घडवले, ग्रेग चॅपेल यांचे विधान
कसोटी क्रमवारीत भारताने कायम राखले अव्वल स्थान, या संघांची झाली घसरण