रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शुक्रवारी (२४ जून) मुंबई संघाच्या तुलनेत मध्य प्रदेशचे पारडे जड दिसत आहे. मध्य प्रदेशचे सलामीवीर यश दुबे आणि तिसऱ्या क्रमांकावरील शुभम शर्माच्या शतकाच्या जोरावर मध्य प्रदेश संघ मुंबईपेक्षा अवघ्या ६ धावांनी मागे आहे आणि त्यांच्या ७ विकेट्स देखील शिल्लक आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मानाची मानली जाणाऱ्या रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना यावर्षी बेंगलोरमध्ये खेळला जात आहे. मुंबई आणि मध्य प्रदेश या दोन्ही संघांनी यावर्षी जबरदस्त प्रदर्शन केले आणि अंतिम सामना गाठला. पण अंतिम सामन्यात आता मुंबई कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. पहिल्या डावात मुंबईने ३७४ धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी सावधगिरी दाखवली आणि तीन विकेट्सच्या नुकसानावर ३६८ धावा केल्या आहेत.
यश दुबे (Yash Dubey) आणि शुभम शर्मा (Shubham Sharma) यांच्यासाठी हा त्यांच्या कारकिर्दीतील रणजी ट्रॉफीचा पहिला अंतिम सामना आहे. दोघांनी यामध्ये मध्य प्रदेशसाठी २२२ धावांची भागीदारी केली. यशने ३३६ चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने १३३ धावा केल्या. तर शुभमने २१५ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११६ धावा केल्या. दोघांनी मिळून मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला.
मुंबईच्या शम्स मुलानीने यष्टीरक्षक हार्दिक तोमरच्या हातात यशला झेलबाद केले, तर शुभमने देखील तोमरच्याच हातात विकेट गमावली. मोहित अवस्थीच्या चेंडूवर शुभम बाद झाला. प्रथम फलंदाजी करताना सरफराज खान (Sarfaraz Khan) एकमेव फलंदाज ठरला, ज्याने अंतिम सामन्यात मुंबईसाठी शतक ठोकले. सरफराजने २४३ चेंडूत १३४ धावा केल्या, ज्यामध्ये १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. गौरव यादवने मुंबई संघाच्या सर्वाधिक ४ खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या.
अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे आणि मध्य प्रदेशने त्यांचे अर्धे काम केले आहे. मध्य प्रदेशचा संघ मोठ्या काळानंतर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. अशात पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन विजय मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. सामना जरी अनिर्णीत झाला, तरी पहिल्या डावात जो संघ आघाडीवर असेल, त्याला विजयी घोषित केले जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयर्लंड की इंग्लंड? ‘दादां’चे ठरलंय कोणता सामना पाहायला जायचं ते
आमंत्रण असूनही रमिझ राजा याने आयपीएल फायनल साठी उपस्थित राहणे टाळले?, कारण झाले स्पष्ट
‘हे’ आहेत निवृत्तीनंतर अठराविश्व दारिद्रय पाहणारे पाच खेळाडू, यादी पाहून तुम्हीही हैरान व्हाल