मुंबई । भारत आणि पाकिस्तान या देशातील क्रिकेटपटू मैदानावर विजय मिळवण्यासाठी एकमेकांना जोरदार टक्कर देत होते. मैदानावर एकमेकांशी भिडणाऱ्या या खेळाडूंचे मैदानाबाहेरील संबंध मात्र मैत्रीपूर्ण होते. भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी यांने अलीकडेच भारत आणि पाकिस्तानमधील खेळाडूंमधील मैत्रीबद्दल भाष्य केले.
भारत आणि पाकिस्तानमधील खेळाडूंच्या मैत्री आणि नातेसंबंधांबद्दल बोलताना कांबळीने सांगितले की रशीद लतीफ पाकिस्तानी चाहत्यांची पत्र कसे त्याच्याकडे पाठवायचा. तो म्हणाला की, दोन्ही संघ मैदानावर चांगले भिडले असले तरी मैदानाबाहेर खेळाडू एकमेकांबद्दल आदराने वागायचे.
विनोद कांबळीने ‘द ग्रेटेस्ट रिव्हलरी पॉडकास्ट’मध्ये म्हटले की, “आम्ही जेव्हा जेव्हा पाकिस्तानात गेलो तेव्हा आम्हाला खूपच चांगली वागणूक मिळाली. एक पाकिस्तानी चाहता माझ्या करिअरच्या सुरूवातीपासूनच मला फॉलो करत होता. 1991 मध्ये मी पदार्पण केले. तो कराचीचा होता आणि तो मला एक पत्र पाठवत असे. कारण त्यावेळी मोबाईल नव्हते. कोणतेही फोन कॉल नव्हते. अशा परिस्थितीत लोक फक्त आपल्या पत्रांद्वारे भावना व्यक्त करत असत.”
तो पुढे म्हणाला, ” तुम्ही विश्वास ठेऊ शकणार नाही. ते पत्र माझ्यापर्यंत कोण पोचवत होते -राशिद लतिफ. तो फॅन राशिद लतीफकडे जाऊन त्याची सर्व पत्रे देत असायचा. जेव्हा राशिद इथे येत असे तेव्हा मला ती पत्रे मिळू लागली. पाकिस्तानातही फॅन फॉलोईंग होते आणि अजूनही आहेत. जेव्हा मी सेवानिवृत्त झालो होतो तेव्हादेखील फॅन फॉलोईंग होती. ”
कांबळीने 1991 मध्ये शारजाहमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताकडून खेळताना कांबळीने 104 वनडे सामन्यात 2477 धावा केल्या. तो कारकीर्दीच्या सुरुवातीला मिळालेले यश कायम टिकवण्यात अयशस्वी झाला.
पाकिस्तानविरुद्ध खेळत कांबळीने 19 सामन्यात 354 धावा केल्या. त्यापैकी त्याची सर्वाधिक धावसंख्या 65 धावा आहेत.
90 च्या दशकातील भारत-पाकिस्तान सामन्यांबद्दल तो म्हणाला की, “पाकिस्तान विरुद्ध खेळताना मैदानावर आमची वैर होती, पण मैदानाबाहेर माझे सर्व मित्र होते. वकार युनूस, वसीम अक्रम आणि इतर सर्व. आमच्यात मैत्री होती जी अजूनही आहे. जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा आम्ही मनापासून खेळायचो, आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.”
तो पुढे म्हणाला, “मैदानाच्या बाहेर, तुम्ही वकारला विचारा, मी त्यांच्याबरोबर कसा मिसळत होतो. वसीम भाई आणि बाकीचे सर्व मित्र होते. आमची ही मैत्री माझ्या पदार्पणापासून झाली. मला अजूनही आठवतंय की, आम्ही ‘इंडिपेंडेंस कप’ मध्ये खेळलो होतो. त्यावेळी मी प्रथमच पाकिस्तानला गेलो होतो.”
ट्रेंडिंग घडामोडी –
६८ वर्षांपूर्वी भारताने केवळ २२३ मिनिटांत दोन वेळा धरला होता तंबूचा रस्ता
जेव्हा महिला होस्टला गेल म्हणतो; ‘लाजू नको बेबी, माझ्याबरोबर डेटवर येणार का?’
कपिल देव यांच्या सल्ल्याने ‘द वॉल’ राहुलचे बदलले आयुष्य अन्यथा…






