भारताने जागतिक क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. वेगवेगळ्या दशकांमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपली अधिराज्य गाजवली आहे. त्यामुळेच भारताच्या ऑल टाइम टॉप-5 क्रिकेटपटूंची निवड करणे हे अत्यंत कठीण काम मानले जाते. मात्र माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी हे अवघड काम करून दाखवले आहे.
अलीकडेच ‘स्टिक टू क्रिकेट’ या कार्यक्रमात मायकल वॉनच्या प्रश्नाला उत्तर देताना रवि शास्त्री यांनी भारताच्या ऑल टाइम टॉप-5 क्रिकेटपटूंची नावे जाहीर केली. त्यांनी ही निवड करताना वेगवेगळ्या दशकांमध्ये सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिल्याचे सांगितले.
शास्त्री म्हणाले की, 70 च्या दशकात सुनील गावस्कर, 80 च्या दशकात कपिल देव, 90 च्या दशकात सचिन तेंडुलकर, त्यानंतर एमएस धोनी आणि विराट कोहली हे त्यांच्या मते भारताचे सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. बिशन सिंग बेदी आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडूही या यादीत येऊ शकले असते, मात्र बुमराह अजून तरुण असून त्याचे क्रिकेट संपलेले नाही, असे शास्त्रींनी स्पष्ट केले.
दरम्यान, ऑल टाइम नंबर वन खेळाडू कोण, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर शास्त्रींनी सचिन तेंडुलकरचे नाव घेतले. दीर्घ काळाची कारकीर्द, अपेक्षांचा प्रचंड ताण, प्रत्येक दशकातील वेगवान गोलंदाजांचा सामना आणि 100 शतकांची कामगिरी यामुळे सचिन तेंडुलकर हा सर्वोत्तम ठरतो, असे त्यांनी सांगितले.
रवि शास्त्री यांच्या या यादीत रोहित शर्माला स्थान न मिळाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 टी20 वर्ल्ड कप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असतानाही त्यांचा समावेश न झाल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे.






