---Advertisement---

भारताच्या प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्रींची होणार उचलबांगडी? ‘या’ गोष्टी ठरणार कारणीभूत

On: मंगळवार, जून 29, 2021 10:30 PM
Ravi Shastri
---Advertisement---

नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ८ गडी राखून मात दिली. आता यानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठवली जात आहे. संघबदल करण्याची मागणी देखील काही चाहत्यांनी केली आहे.

मात्र या संघबदलात केवळ खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक बदलला जावा, अशीही मागणी पुढे आली आहे. अनेक चाहत्यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची हकालपट्टी करा, असा आग्रह धरला आहे. प्रत्यक्षात अजून याबाबत कुठलीही हालचाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने केली नसली तरी येत्या काळात याबाबत पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. मात्र या मागणीमागे नेमकी काय कारणे आहेत, हे या लेखातून जाणून घेऊया.

१) आक्रमक प्रतिमा- रवी शास्त्री यांना पदावरून दूर करण्यामागे सगळ्यात प्रमुख कारण ही त्यांची प्रतिमा आहे. रवी शास्त्री यांची प्रतिमा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीप्रमाणेच आक्रमक आहे. मात्र या आक्रमक दृष्टीकोनामुळेच भारतीय संघाचे नुकसान होत असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघ मोठ्या स्पर्धामध्ये ऐन उपांत्य किंवा अंतिम सामन्यात पराभूत होतो आहे. याला अति आक्रमकपणा कारणीभूत असल्याचा मतप्रवाह आहे. त्यामुळेच रवी शास्त्री यांना विरोध केला जातो आहे.

२) राहुल द्रविडचे आव्हान- रवी शास्त्री यांना विरोध होण्यामागील दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे राहुल द्रविडचे असलेले आव्हान. राहुल द्रविडने गेली काही वर्षे भारताच्या ‘अ’ संघाचे आणि १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद उत्कृष्टपणे सांभाळले आहे. या काळात त्याने उत्तम निकाल देतांना अनेक युवा गुणवान खेळाडू घडवण्याचे काम केले आहे. भारताने काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात दुसऱ्या फळीतील खेळाडूंच्या जोरावर जो ऐतिहासिक विजय मिळवला होता, त्याचे श्रेय आजही अनेकजण द्रविडला देतात. कारण हे सगळे खेळाडू त्याच्याच तालमीत तयार झाले आहेत. याच कारणामुळे आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रवी शास्त्रींकडून काढून घेऊन द्रविडकडे द्यावे, अशी मागणी जोर धरते आहे.

३) मोठे विजेतपद मिळवण्यात अपयश- रवी शास्त्री यांना विरोध होण्यामागील तिसरे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत भारतीय संघाला मोठ्या स्पर्धा जिंकण्यात आलले अपयश. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाच्या कालखंडात भारतीय संघ २०१९ वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि २०२१ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाला. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात भारताच्या नावे एकही मोठी ट्रॉफी नाही. हे कारण देखील त्यांच्या हकालपट्टीसाठी कारणीभूत ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या:

कोहलीने मैदानावरची आक्रमकता कमी करायला हवी, वेस्ट इंडिज दिग्गजाचा सल्ला

आयसीसी क्रमवारीत मितालीचे राज, दमदार अर्धशतकासह पटकावले पाचवे स्थान

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुजाराला मिळणार नारळ? या तीन फलंदाजांचे आहेत पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---