अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विनने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला दुसऱ्या डावात पायचीत करत एका मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
जो रुट अश्विनची चालू कसोटी मालिकेतील ३० वी विकेट ठरला आहे. त्यामुळे एका कसोटी मालिकेत २ वेळा ३० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा अश्विन पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी असा पराक्रम कोणालाही करता आला नव्हता.
भारताकडून कसोटी मालिकेत आत्तापर्यंत ३० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा अश्विनसह एकूण ७ गोलंदाजांनी केली आहे. त्यात अश्विनसह बिशन सिंग बेदी, भागवत चंद्रशेखर, सुभाष गुप्ते, कपिल देव, हरभजन सिंग आणि विनू मंकड यांचा समावेश आहे. त्यातील अश्विन सोडला तर बाकी ६ जणांनी प्रत्येकी १ वेळा कसोटी मालिकेत ३० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनने यापूर्वी २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३१ विकेट्स घेतल्या होत्या
इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत अश्विनची कामगिरी
सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने अश्विनचे घरचे मैदान असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडले. यातील पहिल्या सामन्यात अश्विनने ९ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने दुसऱ्या सामन्यात ८ विकेट्स घेतल्या. तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच पार पडला. या सामन्यात अश्विनने ७ विकेट्स घेतल्या होत्या. आता चौथ्या कसोटीत अश्विनने पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावातील रुट अश्विनची तिसरी विकेट ठरला.
याशिवाय अश्विनने या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १०६ धावांची शतकी खेळी देखील केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
अजब! डोळ्याचे पाते लवते न लवते तोच पंतने चेंडू छातीवर घेत ओली पोपला पाठवले तंबूत, पाहा व्हिडीओ
अन् सिब्लीच्या कॅचने सर्वांना झाली चेन्नई कसोटीतील पुजाराच्या विकेटची आठवण, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ: तू यष्टीमागे इतकी बडबड का करतो? रोहितच्या प्रश्नावर रिषभचे मन जिंकणारे उत्तर