इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्ससाठी उल्लेखनीय कामगिरी केली. आता थेट पुढच्या महिन्यात तो मैदानात पुनरागमन करेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना राहिला होता, जो यावर्षी खेळला जाणार आहे. अश्विनला या सामन्यासाठी जरी निवडले गेले असले, तरी तो सध्या या सामन्याविषयी किंवा इंग्लंड दौऱ्याविषयी कसलाही विचार करत नाहीये.
इंग्लंड दौऱ्यात खेळला जाणारा हा एकमात्र कसोटी सामना १ जुलै रोजी सुरू होईल. मागच्या वर्षी हा सामना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित केला गेला होता. भारतीय संघासाठी हा मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना अतिशय महत्वाचा आहे. कारण, या कसोटी मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे आणि शेवटचा सामना संघाने अनिर्णित जरी केला, तरी मालिका नावावर होईल. विदेशातील हा विजय संघासाठी नक्कीच अविस्मरणीय असेल.
एका खास कार्यक्रमासाठी दिलेल्या मुलाखतीत रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या आगामी सामन्याविषयी व्यक्त झाला. त्याने सांगितल्याप्रमाणे सध्या तो कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे आणि या सामन्याचा कसलाही विचार करत नाहीये. तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे, तर मी आता कसलीही योजना बनवलेली नाहीये. आंतरराष्ट्रीय सत्र खूप लांबले आहे. खूप दिवसांपासून मी बायो बबलमध्ये राहिलो आहे. पाच महिन्यांनंतर मला घरी येण्याची संधी मिळाली आहे. या वातावरणात मला फक्त प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यायचा आहे आणि मी पुढचा विचार करू इच्छित नाहीये.”
मागच्या वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या विरोधात कसोटी मालिका जिंकली होती. त्या संघात अश्विन देखील सहभागी होता. या ऑस्ट्रेलिया दौऱ्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर अश्विनने आठवणी ताज्या झाल्याचे सांगितले. जेव्हा कधी या दौऱ्याचा उल्लेख होतो, तेव्हा त्या चांगल्या आठवणींना उजाळा मिळतो. आम्ही कशा कठीण परिस्थितीत सामना जिंकलो, विजयानंतरचा जल्लोष, या सर्व गोष्टी आता देखील ताज्या असल्यासारखे वाटते, असेही अश्विनने सांगितले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-