भारत आणि इंग्लंड संघामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावरील सामन्याने सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने अनपेक्षितरित्या दमदार कामगिरी करत भारतीय संघावर दबाव निर्माण केला आहे.
मात्र या कठीण परिस्थितीतही भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. आपल्या कामगिरीबद्दल बोलताना अश्विनने गोलंदाजीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे.
“शरीर साथ देत नसतानाही करतो गोलंदाजी”
अश्विन म्हणाला, “दररोज 40 ते 45 षटके गोलंदाजी करणे आणि त्यानंतर पुन्हा सराव करणे, हा माझ्या क्रिकेटचा एक भाग आहे. मला गोलंदाजी करताना इतका आनंद होतो की माझे शरीर मला साथ देत नसले तरी बर्याच वेळा मी गोलंदाजी करत राहतो. मला हे खूप आवडते.”
इशांत शर्माप्रमाणेच अश्विननेही कबूल केले की खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून टॉसची भूमिका महत्त्वाची होती. अश्विन म्हणाला, “जेव्हा मी खेळपट्टी बघितली, तेव्हा मला जाणवले की ही फलंदाजी साठी अनुकूल असेल. ही खरोखरच सपाट खेळपट्टी असून टॉस खूप महत्वाचा ठरला.”
अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली. त्याने 17.3 षटकात 61 धावा देत 6 गडी बाद केले. दरम्यान चौथ्या दिवसाच्या समाप्ती नंतर भारताची धावसंख्या 1 बाद 39 झाली आहे. विजयासाठी पाचव्या दिवशी भारताला आणखी 381 धावांची आवश्यकता असून, सामन्याच्या शेवटच्या दिवशी सर्व क्रिकेट प्रेमींना भारतीय संघाकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
पुन्हा एकदा फ्लॉप झाल्याने रोहितवर भडकले नेटकरी, संघाबाहेर काढण्याचीही केली मागणी
आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी
म्हणून ट्विटरकरांना आली वीरेंद्र सेहवागची आठवण!